पोटासाठी ठेवला बांधून काळजाचा तुकडा

संकेत कुलकर्णी
शनिवार, 18 मार्च 2017

संसाराचा गाडा हाकण्यासाठी मेसमध्ये भांडी घासताना लहानग्या बाळाला ठेवायचे कुठे? कामावर नेले, तरी सारखे 'आई-आई' करून त्याची कामात लुडबुड. अखेरीस 'तिने' पर्याय शोधला. आता ती बाळाच्या करगोट्याला दोरी अडकवून एका ठिकाणी बांधून ठेवते आणि भांडी घासायला जाते. 

औरंगाबाद : संसाराचा गाडा हाकण्यासाठी मेसमध्ये भांडी घासताना लहानग्या बाळाला ठेवायचे कुठे? कामावर नेले, तरी सारखे 'आई-आई' करून त्याची कामात लुडबुड. अखेरीस 'तिने' पर्याय शोधला. आता ती बाळाच्या करगोट्याला दोरी अडकवून एका ठिकाणी बांधून ठेवते आणि भांडी घासायला जाते. 

सेव्हन हिल्स परिसरातील एका कॉम्प्लेक्‍समध्ये बंद शटरला बांधून ठेवणारे रडके बाळ शुक्रवारी (ता. 17) आढळले. कमरेच्या करगोट्याला एका कडीने पट्टा बांधलेला. आजूबाजूला दुकानात येणारे लोक कीव आल्यासारखे त्याकडे बघून जात होते. जवळच एक मोडके खेळणे, मळके दुपटे पडलेले. बराच वेळ आई जवळ न आल्यामुळे सारखे रडणारे हे बाळ काही वेळाने फरशीवर झोपी गेले. बाळावर 'उन्हाने सावली धरली,' तरीही कुणीच आले नाही. 

तासभर शोध घेतला असता, त्याला असे बांधून आई जवळच एका मेसमध्ये भांडी घासायला जाते, असे कळाले. तोवर 1098 या चाईल्ड हेल्पलाईनला फोन लावला. तो नगरला लागला. औरंगाबादेत हेल्पलाइनचे केंद्रच नसल्यामुळे तिथून महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षांचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यांच्या कानावर ही बाब घातली. पण, प्रतिसाद मिळाला शेवटी नगरच्या 'स्नेहालय'च्या स्वयंसेवकांकडूनच.

तेथील महेश सूर्यवंशी, संकेत होले यांनी तिथून सूत्रे हलवली. शहरातील एका महाविद्यालयात शिकणारे सुमित सरोदे आणि त्याचा मित्र कृष्णा हे दोघे स्वयंसेवक धावले. तासाभराने पोलिसही आले. त्यांनी अशा स्थितीत बाळ सोडून जाण्यातील धोक्‍याची आईला जाणीव करून दिली. महिला व बालकल्याण समितीचे सदस्य राजन सातघरे यांनी पैठणहून फोनाफोनी केली. महिलेचे समुपदेशन करण्यासाठी औरंगाबादला येण्याची तयारीही दाखवली. मात्र, सर्वांत आधी ज्यांना फोन केला, त्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षांचा संध्याकाळपर्यंत काहीही प्रतिसाद मिळाला नाही. 

मंग मी काय करू? 
''घरी दारूडा नवरा. पोरगं कामावर सोबत आणलं, तर सारखं मंधीमंधी करतंय. बांधू नको तर मंग काय करू?'' असा सवालच बाळाच्या आईने केला. सुनसान कॉम्प्लेक्‍समध्ये भरदुपारी एकांतात बांधलेल्या या बाळावर काय आपत्ती ओढवू शकते, याची तिला जाणीव करून दिल्यानंतर तिने बाळाला सोडवले. जवळ घेऊन दूध पाजले. पण...नंतर जरा जवळ बांधून ती पुन्हा मेसची थाळी पोचवायला निघून गेली.