दोंडाईचात काँग्रेस नेत्यांसह 34 जणांविरुद्ध गुन्हा 

FIR filed against 34 people including Congress leaders in Dondaicha
FIR filed against 34 people including Congress leaders in Dondaicha

दोंडाईचा - मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांसह राज्यातील डझनभर मंत्र्यांच्या उपस्थितीत दोन ऑगस्टला दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) पालिकेच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे. तत्पूर्वी रविवारी (ता. 29) सकाळी दहानंतर परस्पर उद्‌घाटन, काचा फोडत मालमत्तेचे विद्रूपीकरण, घोषणाबाजीतून दहशत निर्माण केल्या प्रकरणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह 34 जणांवर दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, माजी विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष गुलाबसिंग सोनवणे, प्रतीक महाले, सतीश पाटील, बापू महाजन, नाजीम बशीर शेख, नंदू सोनवणे, कय्यूम पठाण, रामभाऊ माणिक, प्रशांत रमेश पाटील, अभय पाटील, हुसेन बोहरी यांच्याविरुद्ध गुन्हा आज (सोमवारी) दाखल झाला. नंतर अटकेच्या भीतीने संशयित पसार झाले आहेत. त्यांना अटकेची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी केली. 

श्रेयवादावरून ठिणगी दोंडाईचा पालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनावरून कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. या इमारतीसाठी आमच्या सत्ताकाळात निधी मंजूर झाल्याचा कॉंग्रेस आणि शिंदखेडा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा परस्परविरोधी दावा, कॉंग्रेस आघाडीची सत्ता असताना या इमारतीच्या भूमिपूजनाची कोनशिला उखडून फेकून दिल्याच्या वादातून, श्रेयवादातून ही ठिणगी पडली आहे. 

संशयितांचा अनधिकृत प्रवेश 
दोंडाईचा पालिकेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना संशयित कॉंग्रेस नेत्यांसह समर्थकांनी अनधिकृतपणे प्रवेश करून कामकाजात अडथळा आणला, काचा फोडत मालमत्तेचे विद्रूपीकरण केले, विजेचे साहित्य असलेले बॉक्‍स फेकले, आतषबाजी करत घोषणाबाजीतून दहशत निर्माण केली, अभियंता जगदीश पाटील, शिवनंदन राजपूत, मजुरांना धक्काबुक्की केली, आमच्या सत्ताकाळात या इमारतीचे भूमिपूजन झाले असल्याने उद्‌घाटनाचा आमचा हक्क आहे, असे सांगत अधिकारी, ठेकेदाराला निघून जा, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

तक्रार खोटी - काँग्रेस 
यासंदर्भात कॉंग्रेसच्या नेत्या व माजी नगराध्यक्षा जुई देशमुख यांनी सांगितले, की मुख्याधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली खोटी तक्रार केली आहे. नूतन इमारतीचे प्रतिकात्मक उद्‌घाटन झाले. नंतर शांततेत नेते व कार्यकर्ते निघून गेले. कुणीही दगडफेक किंवा मालमत्तेचे विद्रूपीकरण केलेले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com