साप सोडून भुईला धोपटण्याचा प्रकार थांबवा!
औरंगाबाद - औरंगाबादकर दिवाळी सणाच्या आनंदात असताना अचानक औरंगपुऱ्यातील फटाका मार्केटला लागलेल्या अग्नितांडवामुळे अख्खे शहर हादरून गेले. आगीच्या लोळात अख्खे मार्केट बेचिराख झाले. या प्रकरणी आता महसूल, महापालिका; तसेच पोलिस आयुक्त कार्यालयातर्फे चौकशीचे सोपस्कार सुरू आहेत; परंतु पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मात्र साप सोडून भुईला धोपटण्याचा प्रकार सुरू केल्याने अग्नितांडवग्रस्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
औरंगाबाद - औरंगाबादकर दिवाळी सणाच्या आनंदात असताना अचानक औरंगपुऱ्यातील फटाका मार्केटला लागलेल्या अग्नितांडवामुळे अख्खे शहर हादरून गेले. आगीच्या लोळात अख्खे मार्केट बेचिराख झाले. या प्रकरणी आता महसूल, महापालिका; तसेच पोलिस आयुक्त कार्यालयातर्फे चौकशीचे सोपस्कार सुरू आहेत; परंतु पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मात्र साप सोडून भुईला धोपटण्याचा प्रकार सुरू केल्याने अग्नितांडवग्रस्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
ज्यांच्या नावावर परवाना नाही त्यांनी दुकाने थाटल्यास अथवा परवानाधारकांनी दुकाने दुसऱ्यांना चालविण्यासाठी दिल्याचे दिसून आल्यास दोघांवरही गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे. या प्रकारामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांसह परवानाधारक व्यापाऱ्यांमध्ये पोलिस आयुक्तांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजीचा सूर निघतो आहे.
फटाका मार्केट असोसिएशनतर्फे दरवर्षी औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात फटाका विक्रीची दुकाने थाटली जातात. यातील बहुतांश दुकानांचा परवाना हा एकाच्या नावावर असतो, तर दुकान चालविणारा दुसराच असतो. मागील अनेक वर्षांपासून याच पद्धतीने हा व्यवसाय बिनबोभाट सुरू आहे. असे असताना यावर्षीच पोलिसांना या प्रकार दिसून आला काय? इतके दिवस पोलिस यंत्रणेला माहीत नव्हते काय?, माहीत असेल तर त्या वेळी संबंधितांवर कारवाईचा बडगा का उगारला नाही? यामध्ये महापालिका पोलिस विभागातील यंत्रणेला हाताशी धरून "तेरी भी चूप, मेरी भी चूप' असल्याची माहिती पोलिस यंत्रणेला माहीत नव्हती काय? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आग लागल्याचा प्रकार तर घडायचा तो घडून गेला. आता पोलिसांसह सर्वच यंत्रणा नेटाने आग का लागली याचे कारण तपासण्यासाठी कामाला लागली आहे; मात्र या चौकशीच्या फेऱ्यात आग का लागली, याचे मूळ कारण शोधण्याऐवजी परवानाधारक आणि अवैधरीत्या दुसऱ्याच्या परवान्यांवर दुकान थाटणारे असा "शोध' लावण्यातच पोलिस यंत्रणा धन्यता मानत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आग लागण्यामागे शॉर्टसर्किटचे कारण आहे काय, घातपात आहे काय की अन्य काही कारण आहे याचा उलगडा करण्याऐवजी दुसरीकडे लक्ष वळविले जात आहे.
हॉटेल्स, लॉजिंगचे परवानाधारकांवरही कारवाईचे धारिष्ट्य पोलिस दाखवतील?
फटाका मार्केटमधील एकाच्या परवान्यावर दुसऱ्याने दुकान थाटल्याचे आढळल्यास कायद्याचा भंग करून नियम धाब्यावर बसविणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे नोंदविण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. शहरात अशाच प्रकारे अनेक हॉटेल्स, बिअर बार, बियर शॉपी, लॉजिंग बोर्डींगचे परवानेदेखील असेच एकाच्या नावावर, तर चालविणारे मात्र दुसरेच आहेत. अशा परवानाधारकांवरही पोलिस आयुक्त कारवाई करणार काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. जे झाले ते चुकच आहे; परंतु एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय ही भूमिका कितपत योग्य आहे, याचा विचार पोलिस आयुक्तांनी करावा, अशी मागणीही फटाका व्यापाऱ्यांतून होत आहे. अग्नितांडव प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी सखोल चौकशी करावी, त्यासाठी सर्व सहकार्य करण्याची जबाबदारी संबंधित व्यापाऱ्यांचीही आहे. व्यापाऱ्यांनीदेखील महसूल, पोलिस; तसेच महापालिका प्रशासनाला सहकार्य करणेही गरजेचे आहे.