हजला गेलेल्या २७५ भाविकांचा पहिला जत्था परतला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत हजला गेलेल्या मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २७५ भाविकांचा पहिला जत्था रविवारी (ता. नऊ) दुपारी चिकलठाणा विमानतळावर पोचला. 

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत हजला गेलेल्या मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २७५ भाविकांचा पहिला जत्था रविवारी (ता. नऊ) दुपारी चिकलठाणा विमानतळावर पोचला. 

दुपारी २.४५ वाजता विमानतळावर भाविक आल्यानंतर कागदपत्रांची कारवाई पूर्ण करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष इब्राहिम भाईजान, महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख, हज समितीचे सदस्य मोईनुद्दीन कासमी, खिदमाते हुज्जाज समितीचे अध्यक्ष करीम पटेल यांनी सर्व भाविकांचे स्वागत केले. विमानतळाच्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर सर्व भाविकांची त्यांच्या आप्तस्वकियांची गळाभेट घेतली. येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी दोन्ही बाजूंनी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सेवेसाठी अल्तमश ग्रुपच्या २०० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

११ ऑक्‍टोबरला कोणतेही उड्डाण नाही
१ ते १६ ऑक्‍टोबरदरम्यान भाविक परतणार असले तरी ११ ऑक्‍टोबर रोजी उड्डाण नसल्याने या दिवशी भाविक येणार नाहीत. तर १ सप्टेंबर रोजी हजला गेलेले भाविक हे १२ ऑक्‍टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता चिकलठाणा विमानतळावर पोचणार असल्याची माहिती खिदमाते हुज्जाज समितीचे अध्यक्ष करीम पटेल यांनी दिली.

२ हजार ३४१ भाविक परतणार
हज यात्रेसाठी चिकलठाणा विमानतळावरून मराठवाडा विभाग, नगर जिल्ह्यातून ३ हजार ३९५ भाविक गेले होते. आता ९ ते १६ ऑक्‍टोबरपर्यंत सर्व भाविक परतणार आहेत. जे भाविक हजला गेले होते त्यांपैकी ४ भाविकांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. त्यात औरंगाबादेतील इक्‍बाल मोमीन, कन्नड येथील खातूनबी, नांदेड येथील सय्यद गुलाब, जालना, अंबड येथील कंकर शेख यांचा समावेश आहे.

Web Title: The first batch of pilgrims who returned haj

टॅग्स