पाचशेच्या नोटा आजपासून होणार उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - नोटा बंदीनंतर उद्‌भवलेली चलन टंचाई व गोंधळाची परिस्थिती निवळत असल्याची माहिती ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना दिली. त्यावर श्री. क्षत्रिय यांनी राज्यभरात आजपासून पाचशे नवीन नोटा उपलब्ध होत असल्याची माहिती कळविली.

औरंगाबाद - नोटा बंदीनंतर उद्‌भवलेली चलन टंचाई व गोंधळाची परिस्थिती निवळत असल्याची माहिती ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना दिली. त्यावर श्री. क्षत्रिय यांनी राज्यभरात आजपासून पाचशे नवीन नोटा उपलब्ध होत असल्याची माहिती कळविली.

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर गेल्या 13 दिवसांपासून देशात व राज्यात गोंधळाची परिस्थिती आहे. या परिस्थितीचा नेमका आढावा घेण्यासाठी श्री. क्षत्रिय यांनी सोमवारी (ता.20) राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्यात प्रत्येक जिल्ह्यातील समस्यांविषयीचा आढावा घेतला गेला. बहुतांश जिल्हाधिकाऱ्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध झाल्या असल्या तरी खरी आवश्‍यकता ही पाचशे आणि शंभरच्या नोटांची असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर श्री. क्षत्रिय यांनी आजपासूनच राज्यात पाचशेच्या नवीन नोटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हायला सुरवात होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बॅंकांमध्ये मंगळवारी किंवा बुधवारी पाचशेच्या नोटा उपलब्ध होतील अशी शक्‍यता आहे. सहकारी बॅंकांचा विषय हा केंद्रीय स्तरावर चर्चेला असल्याने त्यावर बैठकीत बोलणे टाळले गेले. दुसरीकडे आरबीआयने बियाणे खरेदीकरिता जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी दिल्याची माहिती बैठकीत चर्चिली गेली. फक्त सरकारी आऊटलेटच नव्हे, तर अधिकृत बियाणे वितरकांनाही पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी दिल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत निर्दशनास आणून दिले.

Web Title: Five hundred currency will be available from today