कचरा प्रक्रियेसाठी केली पाच ठिकाणांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहरातील कचराकोंडीला ६२ दिवस उलटले असले तरी अद्याप महापालिकेचा जागेचा शोध सुरूच असून, बुधवारी (ता.१८) चिकलठाणा, नारेगाव, पडेगाव, कांचनवाडी, रमानगर हर्सूल येथे जागेची पाहणी करण्यात आली. या संदर्भात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.

कचराकोंडीला दोन महिने पूर्ण झाल्यानंतरही शहरातील भयावह चित्र कायम आहे. विशेषतः जुन्या शहरामध्ये कचऱ्याचे ढीग असून, नुकत्याच झालेल्या पावसामुळे त्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आलेले असताना दुसरीकडे प्रशासनाचा बैठका, कागदोपत्री प्रस्तावांचा खेळ सुरूच आहे. बुधवारी पुन्हा एकदा कचरा प्रकल्पासाठी जागेची पाहणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना, मालमत्ता विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाच ठिकाणी म्हणजेच चिकलठाणा, नारेगाव, पडेगाव, कांचनवाडी, रमानगर, हर्सूल येथे जागेची पाहणी केली. प्रभाग-एक, दोनमध्ये कचराप्रक्रिया प्रकल्पासाठी जागा शिल्लक नाहीत. त्यामुळे या दोन प्रभागांसाठी पर्यायी जागांचा शोध घेतला जात आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे भालसिंग यांनी सांगितले. 

दहा टन कचरा दिला कंपनीला 
ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात असली तरी सुक्‍या कचऱ्याचे करायचे काय? असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. बुधवारी एका कंपनीला दहा टन कचरा पाठविण्यात आल्याचे श्री. भालसिंग यांनी सांगितले. नाशिकच्या कंपनीने दिलेल्या मशीनचा चांगलाच फायदा होत असून, हे मशीन सध्या सेंट्रलनाका येथे बसविण्यात आले असले तरी ज्या-ज्या भागात कचऱ्याचे ढीग आहेत, तिथे हे मशीन नेऊ, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Five places surveyed for garbage process