पाच शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

पाच शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

औरंगाबाद - बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यात सोमवारी (ता. आठ) डोह, विहिरीत बुडून पाच शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधितांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दोन भावांसह तिघे डोहात बुडाले

अंबाजोगाई - मांजरा नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. तडोळा (ता. अंबाजोगाई) येथे आज दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. तिन्ही मुले एकाच कुटुंबातील असून दोघे सख्खे भाऊ होत.

विकास महादेव आडसूळ (वय ९), वैभव महादेव आडसूळ (१०) व अजय बालासाहेब आडसूळ (१३) हे दुपारी तीनला मांजरा नदीच्या डोहात पोहायला गेले होते. डोहात उतरताच ते बुडाले. नदीकिनारी शेळ्या चारणाऱ्याने ही माहिती तडोळ्याच्या ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थ घटनास्थळी येईपर्यंत तिघांचाही बुडून मृत्यू झाला होता. उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार शरद झाडके, तलाठी रानभरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

उत्तरीय तपासणीसाठी दुपारी चारला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आले.  

तडोळ्यावर शोककळा

एका कुटुंबातीलच तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने तडोळ्यावर शोककळा पसरली होती. महादेव आडसूळ हे शेतमजूर आहेत. त्यांना दोन मुलगे, लहान मुलगी आहे. विकास, वैभव या मुलांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जवळच्याच अकोला येथील जिल्हा परिषद शाळेत विकास तिसरीत, तर वैभव चौथीत होता. नागपंचमीच्या सणामुळे ते गावी, तडोळ्यात आले होते. बालासाहेब आडसूळ हेही शेतमजूर असून त्यांचा मुलगा अजय हा देवळा येथील शाळेत सहावीत होता.

दोन भावंडे विहिरीमध्ये पडली

पिंपळगाव रेणुकाई - विहिरीत तोल जाऊन पडल्याने दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. देहेड (ता. भोकरदन) येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

देहेड येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीतील ईश्‍वर अण्णा बावस्कर (१४), स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकत असलेला अंकुश अण्णा बावस्कर (१६) ही भावंडे मोठा भाऊ संतोषसोबत सकाळी शेतात गेली.

संतोष जनावरांना सोडत असताना दोघे धाकटे भाऊ विहिरीकडे गेले. तिथे खेळताना अचानक विहिरीच्या कडेवरून एकाचा पाय घसरला. त्याला सावरण्यासाठी दुसऱ्याने मदतीचा हात देताच दोघेही पाण्यात बुडाले. दोघांनाही परतण्यास उशीर झाल्याने संतोषने विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी त्याला विहिरीतील पाण्यावर दोघांच्याही चपला तरंगताना दिसल्या. भावांचा शोध घेण्यासाठी त्याने विहिरीत उडी मारली. पाणी जास्त असल्याने त्याला शोध घेता आला नाही. त्याने विहिरीबाहेर येऊन घरच्यांसह ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी दोन्ही मुलांना विहिरीबाहेर काढले. पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही मुलांची उत्तरीय तपासणी झाल्यावर देहेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वडिलांची आठ वर्षांपूर्वी आत्महत्या

मृत दोन्ही भावंडांचे वडील अण्णा बावस्कर यांनी आठ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. मोठ्या हिमतीने पत्नी रुख्मणबाई अण्णा बावस्कर यांनी मुलांच्या शिक्षणासह संसाराचा गाडा सुरळीत केला. नियतीने दोन्ही मुलांना हिरावून नेल्याने रुख्मणबाई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com