चार दिवसांपासून सोनोग्राफी मशीन बंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

उस्मानाबाद - जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी खासगी दवाखान्यांची वाट धरावी लागत आहे. त्यातच सध्या जिल्हा शल्यचिकित्सकदेखील शहरात नसल्याने ही समस्या कोण सोडविणार, असा प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. तब्बल चार दिवसांपासून सोनोग्राफी मशीन बंद असल्याने रुग्णांमधून संताप व्यक्त होत आहे. 

जिल्हा रुग्णालयात केवळ एकच सोनोग्राफी मशीन आहे. त्यामुळे येथे सोनोग्राफीसाठी दररोज रांगा लागलेल्या असतात. दिवसभर रांगेत थांबूनही नंबर येईलच याचीही शाश्‍वती नसते. त्यामुळे दोन दोन दिवस रांगेत उभे राहावे लागते. सोनोग्राफीसाठी गंभीर रुग्णांना प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे साहजिकच रांगेतील रुग्णांना ताटकाळत बसावे लागते. विशेष म्हणजे महिला रुग्णालयातही सोनोग्राफीची व्यवस्था नसून महिलांनाही जिल्हा रुग्णालयातच सोनोग्राफीसाठी आणले जाते. अनेकवेळा मागणी करूनही महिला रुग्णालयात सोनोग्राफी मशीनची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीनची संख्या वाढविण्याची गरज आहे. बरेचदा रांगेत उभे राहूनही नंबर लागत नसल्याने रुग्णांना खासगी सोनोग्राफी सेंटरला जावे लागते. रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यातच आता एकमेव सोनोग्राफी मशीनही बंद पडल्याने रुग्णांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. हे मशीन लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे. 

सोनोग्राफी मशीनचे सॉफ्टवेअर बंद पडल्याचे रुग्णालय प्रशासन सांगत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकही सध्या बाहेरगावी असल्याने याबाबत तातडीने निर्णय कोण घेईल, असा प्रश्‍न विचारला जात आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनीही तांत्रिक बिघाड झाला असून लवकरच तो दुरुस्त केला जाईल, असे सांगितले. 

टॅग्स