मोफत वायफाय देणारी स्मार्टसिटी असेल सेफ सिटी 

मोफत वायफाय देणारी स्मार्टसिटी असेल सेफ सिटी 

औरंगाबाद - माहिती तंत्रज्ञान व संवादच्या माध्यमातून औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचे (ऑरिक) संपूर्ण नियंत्रण केले जाणार आहे. मूळ औरंगाबाद शहराच्या अगोदरच हे संफूर्ण शहर "वायफाय'युक्त झालेले असेल. प्रत्येक कोपऱ्यावर, पथदिव्यांवर सीसीटीव्ही लावलेले असणार. ऑरिक कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून या संपूर्ण शहरातील घडामोडींवर निगराणी आणि नियंत्रण केले जाणार असल्याने हे शहर स्मार्ट सिटीसोबतच सेफ सिटीही असेल. 

माहिती तंत्रज्ञान व संवाद प्रकल्पासाठी मास्टर सिस्टम इंटिग्रेटरची (एमएसआय) नियुक्ती करणे, अमंलबजावणी करणे, संचलन व व्यवस्थापन करणे या कामांसाठी औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लि.तर्फे शनिवारी (ता. चार) निविदा काढण्यात आल्या. 21 मार्चपर्यंत निविदा भरता येणार असून 20 एप्रिलपर्यंत एमएसआयची नियुक्ती केली जाईल. ऑटोमॅटिक व्हेईकल लोकेशन, सोलार पॅनल, ऑरिक कंट्रोल सेंटर, मोफत वायफाय, ई-गर्व्हनन्स, सीसीटीव्ही निगराणी (ऑटोमॅटिक ट्राफिक काउंटर), मल्टी सर्व्हिसेस किऑस्क, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण सेंसर यासारख्या काही आयटी सुविधांचा या स्मार्ट शहरातील नागरिकांना लाभ घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यात शेंद्रा औद्योगिक पार्कच्या 846 हेक्‍टरवर या सर्व सुविधा उभारण्यात येणार आहेत. 

- ऑरिक कंट्रोल सेंटर हा या शहराचा मेंदू असेल. येथूनच शेंद्रा आणि बिडकीनसुद्धा नियंत्रित केले जाईल. प्रत्येक सीसीटीव्हीचे फुटेज पाहता येण्यासाठी मोठे डिस्प्ले, नियंत्रण बोर्ड, कर्मचाऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठीची संनियंत्रण यंत्रणा येथे असेल. 

- ऑरिक ही स्मार्ट सिटीसोबतच सेफ सिटीसुद्धा असेल. सुरक्षित शहरासाठी प्रत्येक कोपऱ्यावर, रस्त्यावर सीसीटीव्ही लावण्यात येतील. चोवीस तास त्याचे मॉनिटरिंग केले जाईल. सुरक्षा आणि वाहतुकीशी निगडित सर्व विभागांशी अंतर्गत संवाद साधण्यासाठी सीसीटीव्हींचा वापर केला जाईल. पथदिव्यांवरच हे सीसीटीव्ही लावले जातील. 

- शेंद्रा औद्योगिक पार्कमध्ये येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर ऑटोमॅटिक ट्रॅफिक काउंटर्स लावले जातील. त्याद्वारे शहरात येणारी व बाहेर जाणारी वाहतूक नियंत्रित होईल. प्रत्येक रस्त्यावरील वाहतुकीचे रिअलटाईम व्यवस्थापन केले जाईल. 

- सार्वजनिक जागांवर मोफत वायफायची सुविधा दिलेली असेल. उच्चदर्जाची आणि परवडणारी ब्रॉडबॅन्ड सुविधा यानिमित्ताने दिली जाईल. संपूर्ण शहरच एकप्रकारे वायफायअंतर्गत आणले जाईल. ई- गर्व्हनन्स सुविधेचा उपयोग करण्यासाठी नागरिकांना मोफत वायफायचा वापर करता येऊ शकेल. 

- ऑरिकमध्ये ठराविक अंतरावर बहुपयोगी डिजिटल किऑस्क उभारण्यात येणार आहेत. त्याचाही वापर नागरिकांना करता येईल. या किऑस्कच्या मदतीने सरकारी सुविधांची पूर्तता करता येऊ शकेल. सरकारी सुविधा शंभर टक्के ऑनलाईन उपलब्ध असतील. 

- शहरातील पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी एन्व्हॉर्नमेंटल सेंसर लावले जातील. प्रदूषणाची पातळी सतत तपासली जाईल. पाऊस, तापमान, आद्रता यांची माहिती सेंसरसोबतच डिजिटल डिस्प्ले बोर्डवर झळकेल. नागरिकांना पर्यावरण आणि पर्यायाने प्रदूषण पातळीची माहिती बघता येऊ शकेल. 

- शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी ऑटोमॅटिक व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा असेल. विशेषतः घनकचरा व्यवस्थापन करणारी वाहने, आपत्कालीन वाहने, सरकारी वाहनांचे नियंत्रण याद्वारे केले जाईल. 

शेंद्रा पार्कची कालमर्यादा 
ऑगस्ट 2017 - एन्व्हॉर्नमेंटल सेंसर, वेबसाईट, नागरी तक्रार निवारण यंत्रण, सिटी ऍपशी निगडित कामे पूर्ण करणे. 
डिसेंबर 2017 - सिटीझन कार्ड, नागरी सुविधा केंद्र, 30 टक्के शहर वायफायखाली आणणे, तसेच डिजिटल किऑस्क आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे. 
मार्च 2018 - निम्मे शहर वायफायअंतर्गत आणणे व फायबर ऑप्टीकची कामे पूर्ण करणे, निम्मे किऑस्क आणि सीसीटीव्ही उभारणीची कामे पूर्ण करणे. 
डिसेंबर 2018 - संपूर्ण शहर वायफायअंतर्गत आणणे, तसेच माहिती तंत्रज्ञान व संवादशी निगडित सर्व कामे पूर्ण करणे, ऑरिक कंट्रोल सेंटर उभारणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com