गजानन महाराज पालखीचे उत्साहात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

उस्मानाबाद - संत गजानन महाराज पालखीचे मंगळवारी (ता. पाच) शहरात आगमन झाले. शहरातील नागरिकांनी पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले. तसेच पालखी मार्गावर महिलांनी स्वागतासाठी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. भर पावसातही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

उस्मानाबाद - संत गजानन महाराज पालखीचे मंगळवारी (ता. पाच) शहरात आगमन झाले. शहरातील नागरिकांनी पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले. तसेच पालखी मार्गावर महिलांनी स्वागतासाठी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. भर पावसातही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

तेरणा महाविद्यालयाच्या परिसरात पालखीचे आगमन होताच नगराध्यक्ष संपतराव डोके यांनी स्वागत केले. त्यानंतर ज्ञानेश्‍वर मंदिराजवळ पालखी काही काळ थांबली. यावेळी मंदिर परिसरातील नागरिकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी अकराच्या सुमारास पालखी ज्ञानेश्‍वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाली. या वेळी या मार्गावर महिलांनी ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. तसेच अनेक दानशूर नागरिकांनी पाणी, केळी, वस्तू आदींचे पालखीतील वारकऱ्यांना वाटप केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिजामाता उद्यान, नेहरू चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस चौक मार्गे सायंकाळी चारच्या सुमारास पालखी लेडीज क्‍लबच्या मैदानावर दाखल झाली. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी महिला व पुरुष भाविकांनी गर्दी केली होती. लेडीज क्‍लबच्या मैदानावर पालखी विसावल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान पालखी लेडीज क्‍लबच्या ठिकाणी विसावल्यानंतर पावसाला सुरवात झाली. त्यामुळे काही काळ वारकरी व भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. रात्री पालखीचा मुक्काम लेडीज क्‍लबच्या मैदानावर राहणार आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पालखी तुळजापूरकडे मार्गस्थ होणार आहे.

Web Title: Gajanan Maharaj Palakhi welcomed the enthusiasm