रत्नाकर गुट्टेंवर 328 कोटींच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

'गंगाखेड शुगर'च्या अध्यक्षांसह संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्ह्यात मोडत असल्याने संबंधितांची आधी चौकशी केली जाईल. त्यानंतर कारवाईची पुढील प्रक्रिया राबवली जाईल.
- संजय हिबारे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

गंगाखेड - आठ ते दहा हजार शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगाखेड शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी आणि बॅंकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विजयनगर माखणी येथील गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा. लि. या साखर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याचे सभासद असणाऱ्या सुमारे 10 हजार शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केली, अशी फिर्याद गिरीधर सोळंके या शेतकऱ्याने दिली आहे. या फिर्यादीवरून कारखान्याचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह अधिकृत संचालक मंडळ, आर्थिक व्यवहार सांभाळणारे तसेच पीक कर्जाची कामे हाताळणारे शेतकी अधिकारी, कर्मचारी, बनावट शिक्के व कागदपत्रे तयार करणारे कर्मचारी, खासगी व्यक्ती आणि आंध्रा बॅंक, युको बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, सिंडीकेट बॅंक, रत्नाकर बॅंकेचे अधिकारी यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. पाच) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, रात्री उशिरा औरंगाबाद पोलिसांच्या माध्यमातून डॉ. रत्नाकर गुट्टे यांना नोटीसही बजावण्यात आल्याचे समजते. पाच राष्ट्रीयकृत बॅंका आणि एका खासगी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून गंगाखेड शुगर ऍन्ड एनर्जी लि. कारखान्याच्या संचालक मंडळाने परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नावावर 328 कोटींचे कर्ज उचलले आहे.

दरम्यान, या संदर्भात डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा दूरध्वनी बंद होता.