जागांच्या ‘कोंडी’त कचरा

औरंगाबाद - गेल्या पाच महिन्यांपासून कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने चिकलठाणा येथील कचराडेपोमध्ये साचलेले ढीग.
औरंगाबाद - गेल्या पाच महिन्यांपासून कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने चिकलठाणा येथील कचराडेपोमध्ये साचलेले ढीग.

औरंगाबाद - कचराकोंडीच्या सात महिन्यांत महापालिकेने जागा निश्‍चिती, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदी, प्रक्रिया केंद्रांसाठी एजन्सी नियुक्त करणे अशी कामे केली. मात्र, त्यानंतरही शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न ‘जैसे थे’ आहे. अद्याप सुमारे २३ हजार मेट्रिक टन कचरा प्रक्रियेअभावी पडून असून, त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता जागांचा नव्याने वाद पेटत असून, यात कचरा अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

नारेगावप्रमाणेच  चिकलठाणा, हर्सूल, कांचनवाडी, पडेगावला सध्या कचऱ्याचे सुमारे २३ हजार मेट्रिक टनाचे ढीग साचलेले आहेत. दरम्यान कचरा प्रक्रियेसाठी मशीन खरेदी, प्रक्रिया केंद्रांसाठी एजन्सी नियुक्त करणे, सिव्हिल कामांची निविदा अंतिम करणे अशी कामे महापालिकेने केली. मात्र, अद्याप कचरा ‘जैसे थे’ आहे. आता नव्याने जागांचा वाद उभा राहिल्याने चिकलठाणा वगळता इतर प्रक्रिया केंद्रांवरील कामे रखडली असून, कचऱ्याच्या अडचणी पुन्हा वाढण्याची भीती नागरिकांत व्यक्त होत आहे.

अशी आहे स्थिती
हर्सूल - पाच महिन्यांपासून येथे ओला व सुका मिक्‍स कचरा टाकण्यात येत आहे. सध्या पत्र्याच्या वरपर्यंत कचऱ्याचे ढीग पोचले आहेत. त्यामुळे कचरा ओसंडून शेडबाहेर येत आहे. या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक कामे करण्यासाठी गेल्यास कंत्राटदाराला पिटाळून लावले जात आहे. 

चिकलठाणा - दुग्धनगरीसाठी आरक्षित असल्या जागेवर कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अद्याप महापालिकेने या जागेची मोजणी केलेली नाही. सध्या तात्पुरत्या शेडचे काम सुरू आहे. मात्र, दीडशे टनाच्या प्रक्रिया प्रकल्पासाठी काम करण्यास परिसरातील शेतकरी विरोध करत आहेत. असे असले तरी चिकलठाण्यात विरोध नाही, असे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. 

पडेगाव - येथील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कत्तलखान्याच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या प्रक्रिया केंद्राचा वाद सध्या न्यायालयात आहे. येथील जागेत महापालिकेने मांस विक्रेत्यांना प्लॉट दिले होते. त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे; तसेच अत्याधुनिक कत्तलखान्याच्या कंत्राटदाराने देखील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com