कचऱ्याविरोधात महिलांचा ७ तास ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

औरंगाबाद - कचरा टाकण्यासाठी निवडण्यात आलेल्या जागांपैकी पडेगाव येथील नियोजित जागेवर कचरा टाकण्यासाठी महापालिकेला मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. शनिवारी वाहने परत पाठवल्यानंतर रविवारीही (ता. २९) महापालिकेच्या वाहनांना कडाडून विरोध झाला. या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून महिलांनी रस्त्यावर तब्बल सात तास ठिय्या देत वाहने अडविली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. महिला हट्टाला पेटल्याने अखेर कचऱ्याने भरलेली वाहने कचरा घेऊनच परत फिरली. 

महापालिकेने रविवारी पोलिस बंदोबस्तात सकाळी कचरा भरलेली वाहने पडेगावकडे पाठवली होती. याची कुणकुण लागल्याने सकाळी सहा वाजेपासूनच राधानगरीतील महिला व पुरुषांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू करून वाहने अडवली. कचऱ्याची वाहने दूर उभी करून महापालिका व पोलिस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तिथे जमलेल्या नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र महिलांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सपशेल नकार दिला. अधिकाऱ्यांनी पडेगावात येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. महिला व नागरिकांनी ठिय्या दिल्यामुळे रस्त्यावर वाहने थांबविण्यात आली. महापालिका लोकांची व न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचा आरोपसुद्धा यावेळी आंदोलकांनी केला.

दुसरे नारेगाव करू नका! 
सध्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली असल्याने प्रशासनाने पडेगावात कचरा टाकण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या गावाचे दुसरे नारेगाव करू नका. कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकू देणार नाही. पोलिसांनी बळाचा वापर केला तरीही आम्ही मागे हटणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत नागरिकांनी बजावले. ज्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे ती जागा कत्तलखान्यासाठी आरक्षित असल्याचे लोकांचे म्हणणे होते. कचऱ्याचा प्रश्‍न महापालिकेच्या अखत्यारीत असला तरी नागरिक पोलिसांवर राग काढत आहेत. दुपारी सुमारे दीड - दोन वाजेपर्यंत नागरिकांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलन मागे घेण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासनाने कचरा भरलेली वाहने परत बोलावून घेतली. नंतर हा कचरा अज्ञातस्थळी नेऊन टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नोटिसींमुळे हट्टाला पेटले 
पडेगाव येथे कचरा टाकण्यासाठी सर्वांत जास्त विरोध होत असल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कचऱ्याच्या गाड्या पाठवण्यापूर्वी पोलिस प्रशासनाने कचरा टाकण्याच्या कामात अडथळा आणला तर कठोर कारवाई केली जाईल, अशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. यातूनच चिडलेल्या नागरिकांनीही हट्टाला पेटून कचऱ्याच्या वाहनांना जोरदार विरोध केल्याचे बोलले जाते.

Web Title: garbage issue women agitation