गॅस जोडणी अवघ्या 100 रुपयांत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

कळंब - पंतप्रधान उज्ज्वल योजनेतून दारिद्य्ररेषेखालील महिला लाभार्थींना अवघ्या 100 रुपयांत गॅस जोडणी देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुक्‍यातील 500 महिला लाभार्थींनी गॅस जोडणीची मागणी नोंदवली आहे. योजनेतून गॅस जोडणीची मागणी तूर्त मोफत असून, लाभार्थींच्या मागणीला मंजुरी मिळाल्यानंतरच 100 रुपयाचा मुद्रांक द्यावा लागणार आहे. 

कळंब - पंतप्रधान उज्ज्वल योजनेतून दारिद्य्ररेषेखालील महिला लाभार्थींना अवघ्या 100 रुपयांत गॅस जोडणी देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुक्‍यातील 500 महिला लाभार्थींनी गॅस जोडणीची मागणी नोंदवली आहे. योजनेतून गॅस जोडणीची मागणी तूर्त मोफत असून, लाभार्थींच्या मागणीला मंजुरी मिळाल्यानंतरच 100 रुपयाचा मुद्रांक द्यावा लागणार आहे. 

पंतप्रधान उज्ज्वल योजनेतून दारिद्य्र रेषेखालील महिला लाभार्थ्यांना अवघ्या 100 रुपयांत गॅस जोडणी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या संदर्भात अंमलबजावणीला तालुक्‍यात सुरवात झाली आहे. येथील गॅस एजन्सीजकडे 500 महिला लाभार्थिंनी गॅस जोडणीची नोंदणी केली आहे. तालुक्‍यात 20 हजारच्या जवळपास दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींची संख्या आहे. याशिवाय 2011 च्या जनगणनेसुसार दारिद्य्र रेषेखालील यादीनुसार महिला लाभार्थिंना पंतप्रधान उज्ज्वल योजनेतून गॅस जोडणी देण्याचे धोरण शासनाचे आहे. सध्या फक्त महिला लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. यादी एकत्र करून मंजुरीसाठी पेट्रोलियम विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर 100 रुपयांचा मुद्रांक लाभार्थींकडून घेतला जाणार आहे. एका सिलेंडरमागे शासनाकडून 225 रुपयांची सबसिडी दिली जाते. सिलेंडरची मूळ किंमत 455 आहे. तर गॅसधारकांकडून 680 रुपये प्रति सिलेंडरला घेतले जातात. लाभार्थींना फक्त 100 रुपयांत गॅस जोडणी हवी असेल तर त्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीतून गॅस जोडणीसाठी निश्‍चित केलेल्या रकमेत सबसिडीची रक्कम वळती केली जाणार आहे. 100 रुपयांत गॅस जोडणी नको असल्यास दारिद्य्र रेषेखालील महिला लाभार्थींना 1 हजार 552 रुपये व 100 रुपयांचा मुद्रांक, असे एकूण एक हजार 652 रुपयांत गॅस जोडणी व शेगडी दिली जाणार आहे. यामुळे सबसिडीतून ठराविक रक्कम वळती होणार नाही.
 

पाच महिन्यांची प्रतीक्षा
गॅस एजन्सीकडे प्राप्त लाभार्थींची यादी पेट्रोलियम विभागाच्या साईटवर ऑनलाइन भरण्यात येणार आहे. योजनेत लाभार्थी पात्र की अपात्र हे ठरवण्याचे काम गॅस एजन्सीजकडे सोपविण्यात आले आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर मंजुरी व त्यानंतर लाभार्थींना गॅस जोडणी देण्यात येणार असल्याने ही प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान पाच महिने लागण्याची शक्‍यता आहे.
 

आवश्‍यक कागदपत्रे
लाभार्थींकडून कुटुंबांतील सर्वांचे आधार क्रमांक, रेशन कार्ड झेरॉक्‍स, बॅंक खाते क्रमांक, फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्‍यक आहेत. रेशनकार्ड झेरॉक्‍स नसेल तरी चालेल. कारण गॅस एजन्सीजकडे दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींची माहिती अपडेट आहे. लाभार्थींच्या कुटुंबात पूर्वीची गॅस जोडणी असेल तर या योजनेतून गॅस जोडणी मिळणे कठीण असल्याचे तेजल गॅस एजन्सीज चे मॅनेजर महेश ताटे यांनी सांगितले.

Web Title: Gas connection just Rs 100