गेट गोईंग मॅरेथॉनमध्ये दोन हजार स्पर्धकांचा सहभाग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे बीज रोवणाऱ्या गेट गोईंग संस्थेच्या वतीने रविवारी (ता. पाच) मॅरेथॉन शर्यत आयोजित करण्यात आली होती. यात 2000 स्पर्धकांनी भाग घेतला. यात "रन फॉर हर' हे ब्रीद हाती घेत शहरातील चिमुकल्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. 

औरंगाबाद - शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे बीज रोवणाऱ्या गेट गोईंग संस्थेच्या वतीने रविवारी (ता. पाच) मॅरेथॉन शर्यत आयोजित करण्यात आली होती. यात 2000 स्पर्धकांनी भाग घेतला. यात "रन फॉर हर' हे ब्रीद हाती घेत शहरातील चिमुकल्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. 

शहरात वॉकेथॉनपासून सुरवात करणाऱ्या औरंगाबादच्या गेट गोईंग संस्थेच्या वतीने यंदा पहिल्यांदाच हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाच आणि दहा किलोमीटर गटांशिवाय यंदा यात 21 किलोमीटरचा गटही समाविष्ट करण्यात आला होता. सकाळी सहाला 21 किलोमीटरच्या गटाला झेंडा दाखविण्यात आला. विभागीय क्रीडा संकुल- काल्डा कॉर्नर- अमरप्रीत चौक- सेव्हनहिल- सिडको बसस्टॅंड- चिकलठाणा सिव्हील हॉस्पिटल आणि परत याच मार्गाने फिरणाऱ्या या गटात तरुणांसह सातत्याने सराव करणाऱ्या शहरवासीयांनी सहभाग नोंदविला. सहा वाजून दहा मिनिटांनी दुसऱ्या गटाला (10 कि.मी.) विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी झेंडा दाखविला. या वेळी आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवेही उपस्थित होती. या वेळी गेट गोईंग या संस्थेच्या सदस्यांची उपस्थिती होती. त्यानंतर पाच किलोमीटर गटही सहा वाजून 20 मिनिटांनी रवाना करण्यात आला. 10 किलोमीटरचा गट हा सेव्हनहिल पुलापासून माघारी फिरला; तर पाच किलोमीटरमध्ये धावणारे स्पर्धक काल्डा कॉर्नर येथून पुन्हा माघारी धावले. 

"दंगल', "भाग मिल्खा'ची धमाल 
स्पर्धेला सुरवात करण्यापूर्वी विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात स्पर्धकांसाठी वॉर्मअपची सोय करण्यात आली होती. बॉलिवूडच्या गाण्यांवर सूर्योदयापूर्वीच स्पर्धकांनी वॉर्मअपला सुरवात केली. "दंगल' आणि "भाग मिल्खा भाग' या गाण्यांवर व्यायाम करणाऱ्यांसह अन्य लोकांनीही ताल धरला. "बापू सेहत के लीए...' आणि "भाग मिल्खा भाग' या गाण्यांनी सगळ्यांना पळण्याचे बळ दिले. 

एनर्जल, पाण्याचे जागोजागी स्टॉल 
निम्मा जालना रोड व्यापणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. स्पर्धकांना एनर्जल आणि पाण्याची सोय या स्टॉलवर करण्यात आली होती. अंगात बळ राहावे आणि ताजेतवाणे राहण्यासाठी स्पर्धकांनी धावतच एनर्जलचे ग्लास रिकामे केले. पळताना हाती असलेले ग्लास स्पर्धकांनी डस्टबीनपर्यंत हातीच धरले होते. 

पदकांसह फोटो काढणाऱ्यांची गर्दी 
स्पर्धेत निर्धारित धाव पूर्ण करणाऱ्यांना आयोजकांनी पदके प्रदान केली. स्पर्धा पूर्ण करण्याचा आनंद या पदकाने द्विगुणित केला. या पदकांसह फोटो काढण्यासाठी खास सोय गेट गोईंग संस्थेच्या वतीने विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर करण्यात आली होती. त्यात खास स्टेज आणि त्याभोवती सजावट करण्यात आली होती. या सजावटीसह फोटो काढणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. याशिवाय या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी जागोजागी घोळके केले होते. 

"गेट गोईंग'चा हा चमू होता कार्यरत 
डॉ. उमा महाजन, डॉ. नीती सोनी, डॉ. प्रिया देशमुख, डॉ. चारुशीला देशमुख, निना निकाळजे, आरती अग्रवाल, डॉ. भावना लोहिया, दीपाली डबरी, डॉ. संतोष तोतला, डॉ. सुजाता लाहोटी, डॉ. संगीता देशपांडे यांच्या नियोजन आणि निगराणीखाली ही स्पर्धा पार पडली. त्यांच्यासह संपूर्ण मार्गावर गेट गोईंगचे शेकडो स्वयंसेवक प्रत्येक पॉईंटवर उपस्थित होते. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता. शहरात येणाऱ्या रस्त्याची बाजू या स्पर्धेसाठी बंद करण्यात आली होती. त्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जागोजागी बॅरिकेडिंग करण्यात आले होते. एनसीसीचेही चाळीस कॅडेट या स्पर्धेच्या नियोजनाचा भाग बनले होते. 

आता लक्ष्य दिल्ली मॅरेथॉन - ज्योती 
21 किलोमीटरच्या गटात सहभागी झालेली स्टार धावपटू ज्योती गवते हिने आता दिल्ली मॅरेथॉन जिंकण्याचा चंग बांधला आहे. या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या या स्पर्धेसाठी आपण सध्या रोज तीन तास सराव करीत असल्याचे ज्योतीने सांगितले. परभणीच्या 29 वर्षीय ज्योतीने ही शर्यत एक तास 24 मिनिटांत पूर्ण केली. 1 तास 20 मिनिटांचे उद्दिष्ट ठेवून धावणाऱ्या ज्योतीला यासाठी चार मिनिटे अधिक वेळ लागला. 25 फुल मॅरेथॉनचा आकडा पार करणाऱ्या ज्योतीने यापूर्वी तीस किलोमीटरची दौड केल्याने आपल्याला काहीसा थकवा वाटला. त्यामुळे चार मिनिटे अधिक लागल्याचे सांगितले.

Web Title: Gate Going Marathon