सावकारीला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

गेवराई - सावकाराकडून घेतलेले कर्ज परत करूनही पुन्हा मारहाण करून पैशांची मागणी झाल्याने, सावकाराच्या जाचाला कंटाळून एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आत्महत्या केली. तालुक्‍यातील कुंभारवाडी येथे रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. श्रीकृष्ण गंगाधर चौधरी (वय 48) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तालुक्‍यातील आम्ला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले श्रीकृष्ण चौधरी हे गेवराईतील ताकडगाव रोड येथे राहत होते. दोन दिवस सुट्या असल्याने परिवारासह ते कुंभारवाडी येथे होते. राहत्या घरी रविवारी पहाटेच्या सुमारास फॅनला त्यांनी गळफास घेतला. याप्रकरणी मुलगा अमोल याच्या तक्रारीवरून गेवराई पोलिसांत मादळमोही येथील किरण गावडे, कल्याण तळेकर, केशव गावडे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.