घाटीच्या वसतिगृहात ‘अल्कोहोलिक’ उपचार

Ghati-Hostel
Ghati-Hostel

औरंगाबाद - हजारो तज्ज्ञ डॉक्‍टरांना घडवणाऱ्या व लाखो रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (घाटी) नावलौकिक धुळीस मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. यूजी हॉस्टेलकडे प्रशासनाचा काणाडोळा झाल्याने अस्वच्छतेने कळस गाठला, तर येथे कुणाचाही धाक नसल्याने सर्रास ओल्या पार्ट्या होत आहेत. त्यामुळे अभ्यासू भावी डॉक्‍टरांची कुचंबणा होत आहे. 

घाटी प्रशासनाकडे तक्रार केली तर तुमची अटेंडन्स नाही, दारू पिऊन पार्ट्या करता, तोडफोड करता, तर कशा सुविधा द्यायच्या? असा सवाल केला जात असल्यामुळे अभ्यासू विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. जास्त नखरे दाखवले तर परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशी भीतीही दाखवण्यात येत असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी परिस्थिती आहे. कुणीच टोकत नसल्याने गैरप्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. बाहेरून चमकणारे वसतिगृह आतून अस्वच्छ व असुविधांचा निवारा आहे.

सर्वत्र अस्वच्छता
पदवी शिक्षणासाठी बांधलेल्या २३५ व ४० रूमच्या या दोन्ही वसतिगृहांची इमारत जुनी आणि काहीशी जीर्ण असली तरी सुधारणेसाठी वाव आहे; मात्र त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. स्वच्छता आरोग्यासाठी गरजेची आहे असा संदेश डॉक्‍टर देतात; मात्र इथे भावी डॉक्‍टरच अस्वच्छतेच्या विळख्यात आहेत. दोन मजली वसतिगृहात प्रत्येक कोपऱ्यात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सिगारेटचे थोटकं, दारूच्या बाटल्या पडून आहेत. बाथरूमची दुरवस्था, बाह्यपरिसराची साफसफाईची तर कायमची बोंब आहे.

शंभरजण जलजन्य आजारांचे शिकार 
वसतिगृहात गेल्या आठवडाभरापासून विद्यार्थी लूज मोशनने त्रस्त आहेत. उपचार घेऊनही परत-परत तोच त्रास होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. असा त्रास होणाऱ्यांची संख्या शंभरावर पोचली आहे. तरी स्वच्छता, स्वच्छ पाणी यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 

वॉर्डन कोण, हेच माहीत नाही
वसतिगृहात वॉर्डन कोण, हेच येथील विद्यार्थ्यांना माहीत नाही. सहायक वॉर्डन म्हणून काम पाहणारे बंधपत्रित सहायक प्राध्यापकांनी मध्यंतरी समस्या सोडवण्यावर भर दिला होता; मात्र त्यांचा बॉण्ड संपत आल्याने गेल्या महिनाभरापासून कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. कोण राहते? कोण येते? काय प्रकार इथे सुरू आहेत? विद्यार्थ्यांना काही समस्या आहेत का? हेही विचारायला कोणी नाही. त्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com