सोने-चांदीच्या भावात वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - जागतिक बाजारात मंदीचे सावट असतानाही स्थानिक बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. पंधरा दिवसांत सोन्याची किंमत ४०० रुपयांनी वाढली आहे. १८ मार्चला येणाऱ्या अक्षयतृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर ही वाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. 

नोटाबंदी, जीएसटी यासह नवनव्या नियमांमुळे दीड वर्षापासून सराफा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. मंदीचे सावट असलेले व्यावसायिक यातून बाहेर येण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. 

गुढीपाडव्याला सोने-चांदीच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल होईल, अशी अपेक्षा होती; मात्र बाजारपेठेत किरकोळ उलाढाल झाली. यामुळे अक्षयतृतीयेला ग्राहक वाढविण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांनी विविध ऑफर्स दिल्या आहेत. यात मजुरीत २० ते २५ टक्‍के सूट, इन्शुरन्स यासह विविध योजना जाहीर करीत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. एक एप्रिलला सोन्याचा दर ३१ हजार ४०० रुपये होता. रविवारी (ता. १५) सोन्याचा दर ३१ हजार ८०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर गेला आहे. यासह चांदीचाही दर ३९ हजार ७५० रुपये किलोवर गेला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सोने-चांदी विक्रेत्यांकडून विविध ऑफर्स देऊन विक्री वाढविण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र त्या तुलनेत ग्राहकांची संख्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.  

यंदा गुढीपाडव्याला बाजारपेठ उसळी घेईल असे वाटत होते; मात्र तसे झाले नाही. आताही विविध ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे. अक्षयतृतीयेला बाजारपेठेत चांगली उलाढाल होईल, असे वाटत आहे.
- राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, औरंगाबाद.

Web Title: Gold and silver prices high