गुडमॉर्निंग पथकाने केले शहरातील दीडशे जणांचे गुलाबपुष्पाने स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

धारूर नगरपालिकेचा भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत पुढाकार 

धारूर नगरपालिकेचा भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत पुढाकार 

किल्लेधारूर -  नगरपालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाने भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत शहरातील विविध भागांतील दीडशे जणांचे रविवारी (ता. 29) गुलाबपुष्पाने स्वागत केले. 
दरम्यान, शहरात ज्यांच्या घरी स्वच्छतागृह नाही, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करून भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत नगरपालिकेकडून 12 हजार व प्रोत्साहनपर दोन हजार असे एकूण चौदा हजार रुपये अनुदान घ्यावे, अशी जाहिरात ध्वनिवर्धकावर आणि शहरातील चौकाचौकांत फलक लावून केली. त्यानंतर नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांत नगरपालिका कर्मचाऱ्यांची गुडमॉर्निंग पथके रविवारपासून तैनात करण्यात आली. नेमकी किती कुटुंबे स्वच्छतागृहाविना आहेत, त्यांच्यासाठी नेमकी काय उपाययोजना करावयाची या संदर्भातील सर्वेक्षण करण्याच्या हेतूने ही पथके सकाळी साडेपाच वाजता शहरातील जुना दवाखाना, कसबा विभाग, धनगरवाडासह विविध भागांत जाऊन शोध घेत आहे. त्यासोबत उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन समजावून सांगत आहेत; तसेच पोलिस कार्यवाही आणि शासकीय योजनापासून वंचित राहावे लागेल असे सांगत आहेत. त्यावर नागरिकही स्वच्छतागृह बांधून त्याचा वापर करू, असे आश्‍वासक बोलत आहेत. एकेकाळी नागरी स्वच्छता अभियानात पुढे असलेल्या नगरपालिकेचे नेतृत्व नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या हाती दिल्यामुळे खऱ्या अर्थाने भारत स्वच्छ अभियान राबवून स्वच्छता अभियानाला गती येईल, असा विश्‍वासही नागरिक व्यक्त करीत आहेत. नगरपालिकेच्या गुडमॉर्निंग पथकात कार्यालय अधीक्षक श्रीकांत वडगांवकर, अविनाश कापसे, भारत तांबवे, इशरत मोमीन, बजरंग शिनगारे, माणिक लोखंडे आदींसह कर्मचारी सहभागी झाले.