केवळ दोन तासांमुळे मृत शेतकऱ्याचे कुटुंबीय विमा योजनेपासून वंचित 

केवळ दोन तासांमुळे मृत शेतकऱ्याचे कुटुंबीय विमा योजनेपासून वंचित 

औरंगाबाद - आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे आपणच कैवारी असल्याचा आव आणत राज्य सरकारतर्फे योजनांच्या घोषणा होत असल्या तरी नियमांचा अडसर पुढे करून शेतकऱ्यांना लाभ दिला जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. विमा पॉलिसी सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी अपघाती मृत्यू झाला, असे कारण पुढे करत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मदत वैजापूर तालुक्‍यातील शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना नाकारण्यात आली. त्यामुळे या कुटुंबीयांना वर्षभरापासून मदतीसाठी खेट्या माराव्या लागत आहेत. 

अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 2015-16 वर्षासाठी नॅशनल विमा कंपनीसोबत करार करण्यात आला. विमा कंपनीचा कालावधी 1 डिसेंबर 2015 पासून सुरू होऊन 30 नोव्हेंबर 2016, असा एक वर्षाचा होता. ज्ञानेश्‍वर गायके (रा. भिवगाव) या शेतकऱ्याचा 1 डिसेंबर 2015 ला सकाळी 8ः25 वाजता अपघात झाला. मात्र विमा पॉलिसी ही 1 डिसेंबरला कार्यालय उघडण्याच्या वेळेत सकाळी 10 वाजता सुरू होत असल्याचे कारण देत त्यांच्या कुटुंबीयांना मदत नाकारण्यात आली. दरम्यान, करार संपला आणि वर्ष उलटले तरीही शेतकऱ्याच्या वारसास दोन लाख रुपयांच्या विम्यापासून वंचित राहावे लागले आहे. वारसांकडून विमा कंपनीला आवश्‍यक असलेल्या शवविच्छेदन पूर्वीचा, नंतरचा अहवाल, सातबारा, फेरफार, मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर आदी कागदपत्रे देण्यात आली. मात्र आमच्या कंपनी कार्यालयातील खेट्या संपल्या नाहीत असे, मृत शेतकऱ्याचे बंधू बापू गायके यांनी सांगितले. यासंदर्भात विमा कंपनीशी संपर्क साधला असता, आम्ही पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाला दरमहिन्याला पाठपुराव्यासाठी स्मरणपत्र पाठवत आहोत, असे सांगण्यात आले. दरम्यान, कंपनीला बजाज कॅपिटल ब्रोकर कंपनी सहायक करत असून यंदा कंपनी बदलण्यात आली आहे. 

केवळ 40 टक्के प्रकरणे निकाली 

राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने अपघात विमा योजनेची घोषणा केली. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर मजूर, कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी कार्य केले मात्र त्यांच्याच नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून मात्र औरगांबाद विभागातून 550 प्रस्तावांपैकी केवळ 240 ते 260 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून 143 प्रस्तावांपैकी केवळ 18 शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळाला आहे. 

दोन लाखांसाठी दोन तास उशिरा मरावे का? 
विमा कंपनीचा पॉलिसी एक तारखेला सकाळी दहा वाजेपासून सुरू झाली. त्याआधी म्हणजेच एक तारखेला मध्यरात्री बारा वाजेपासून सकाळी 9ः59 वाजेपर्यंत जर एखाद्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला तर तो शेतकरी विमा योजनेस पात्र ठरत नसल्याचे विमा कंपनीतर्फे सांगण्यात आले. मग दोन लाखांच्या पॉलिसीसाठी शेतकऱ्याने दोन तास उशिरा मरावे का, असा सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com