शासकीय कार्यालये, खासगी संस्थांकडे सव्वादोन कोटींची थकबाकी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

कराचा त्वरित भरणा करावा. अन्यथा कारवाई केली जाईल. सोयीसुविधा, सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी सात दिवसांत कराचा भरणा करावा. 
- बाबासाहेब मनोहरे, मुख्याधिकारी. 

उस्मानाबाद - पालिकेचा कर थकविण्यात शासकीय कार्यालये तसेच खासगी संस्था पुढे आहेत. थकबाकीदारांनी सात दिवसांच्या आता कराचा भरणा करावा, अन्यथा जप्तीची नोटीस देऊन पाणीपुरवठ्याची सेवा खंडित करण्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, अद्याप तब्बल दोन कोटी 34 लाख 30 हजार 198 रुपयांची थकबाकी आहे. 

मालमत्ता कराच्या माध्यमातून पालिकेला महसूल मिळतो. दरवर्षी मालमत्ता तसेच पाणीपट्टीच्या माध्यमातूनही कराची आकारणी होते. हेच पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. यंदाच्या वर्षी नोटाबंदीचा फायदा पालिकेला झाला आहे. प्रमुख थकबाकीदार असलेल्यांनी या काळात मोठ्या प्रमाणात कराचा भरणा केला आहे. आतापर्यंत तब्बल चार कोटी 25 लाख 33 हजार 912 रुपयांचा कर भरणा झाला आहे. अजूनही तब्बल दोन कोटी 34 लाख 30 हजार 198 रुपयांची थकबाकी आहे. 

शासकीय कार्यालये, खासगी संस्था मोठ्या थकबाकीदार 
सामान्य नागरिक प्रामाणिकपणे कराचा भरणा करतात; परंतु शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात थकीत रक्कम असल्याचे दिसून येत आहे. तसेच खासगी संस्थाही मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. प्रमुख थकबाकीदारांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकचे उपविभागीय अभियंता कार्यालयाकडे 67 लाख 17 हजार 266, पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे 43 लाख 56 हजार 768, कृष्णा खोरे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कार्यालय 13 कोटी 70 लाख 999, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे तीन लाख 75 हजार 340, उच्च माध्यमिक जिल्हा परिषद कन्या प्रशालेकडे चार लाख 23 हजार 516 रुपये; तसेच श्री संत गोरोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध विभागाकडे व सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध इमारतीकडे लाखो रुपयांची कराची रक्कम थकीत झाली आहे. पालिकेकडून अशा संस्थांना विविध सेवा पुरविल्या जातात. त्याच्या मोबदल्यात कराचा भरणा करणे अपेक्षित असते. सामान्य नागरिकांवर कराचा भरण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, शासकीय कार्यालये तसेच खासगी संस्था जर कराचा भरणा करण्यात कुचराई करीत असतील, तर समान्य नागरिकांनी कोणाचा आदर्श घ्यावा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

कराचा त्वरित भरणा करावा. अन्यथा कारवाई केली जाईल. सोयीसुविधा, सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी सात दिवसांत कराचा भरणा करावा. 
- बाबासाहेब मनोहरे, मुख्याधिकारी.