जिल्ह्यात गटबाजीच राष्ट्रवादीच्या मुळावर

जिल्ह्यात गटबाजीच राष्ट्रवादीच्या मुळावर

बीड - सत्ता नसली तरी आजही सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ताकदवान पक्ष आहे. पण, एकमेकांच्या पायात पाय घालण्याच्या पद्धतीमुळे पक्षाला विरोधकांपेक्षा पक्षातल्या नेत्यांचीच जास्त भीती आहे. श्रेष्ठींनी कानउघाडणी करून प्रत्येकाला वेळीच मर्यादा आखून दिल्या नाहीत तर जिल्हा परिषदेत पुन्हा कमबॅक अवघड आहे. 

गेली पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मातब्बर नेते असल्याने पक्षाने जिल्ह्यात खोलवर पाळेमुळे रोवली आहेत. पक्षाच्या श्रेष्ठींची तशी जिल्ह्यावर नेहमीच चांगली मर्जी राहिलेली आहे. पण, सत्ता असताना आणि आताही निर्णय प्रक्रिया मुंबई-पुण्यातूनच होते. सत्तेच्या काळात निधीवाटप असो की पदांचे वाटप, त्याचा ‘वरूनच निरोप’ येई. सर्वांना आपापल्या ‘सीमा’ आखून देत तेवढ्यातच चालवा असा अप्रत्यक्ष इशाराच पक्षाने दिलेला होता. पण, अलीकडे एकमेकांच्या ‘इलाक्‍यात घुसखोरी’, नेत्यांची संख्या वाढल्याने ‘उंचावलेल्या अपेक्षा’ आणि कोणाला स्वत:चे अस्तित्व दाखवायचे असते, कोणी जुणे हिशेब काढतो तर कोणी ‘दुसऱ्याच्या इलाक्‍यातली’ आपली ताकद दाखवत असतो. पण, यातून पक्षाचेच नुकसान होते. असाच प्रकार होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे श्रेष्ठींनी वेळीच कानउघाडणी करून सर्वांना मर्यादा आखून दिल्या तरच ‘झेडपी’त चांगली कामगिरी होऊ शकते. 

गेवराईत घरचं थोडं अन्‌ आष्टी व बीडकरांचं घोडं
गेवराईत अगोदरच राष्ट्रवादीचेच आमदार अमरसिंह पंडित व बदामराव पंडित यांनी एकमेकांविरोधात हाबुक ठोकले आहेत. आमदार पंडित यांचे समर्थक पक्षाच्या चिन्हावर तर बदामराव पंडितांचे समर्थक आघाडीच्या माध्यमातून लढतील. तसे सुरवातीपासून आमदार क्षीरसागरांची मर्जी बदामराव पंडितांच्या बाजूने राहिलेली आहे. आता, मागच्या विधानसभा निवडणुकीत शिरूर भागातील आमदार पंडित यांच्या समर्थकांनी धसांच्या विरोधात केलेले काम, पक्षाच्या बैठकीत आमदार पंडित यांनी धसांना केलेला विरोध आणि जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती निधीच्या वाटपात अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी घातलेला खोडा या कारणांनी बदामरावांच्या आघाडीला सुरेश धस यांचेही बळ मिळण्याची शक्‍यता आहे. तर बहिरवाडी आणि पिंपळनेर हे दोन गट बीड आणि गेवराई मतदारसंघात येत असल्याने या ठिकाणच्या उमेदवारींवरून आमदार पंडित व आमदार क्षीरसागरांत ओढाताण निश्‍चित आहे.

अब अपनोंसेही दो हात...

बीड मतदारसंघावर क्षीरसागरांची पकड असली तरी त्यांचे सर्व विरोधक युती करून उतरणार असल्याने कडवी झुंज होणार आहे. त्यातच ग्रामीण भागातली राष्ट्रवादीची यंत्रणा सांभाळणाऱ्या सभापती संदीप क्षीरसागर यांना पालिका निवडणुकीत चांगले यश आल्याने त्यांच्या समर्थकांचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे झेडपीसाठीही पुन्हा ‘आघाडी’ रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना विरोधकांबरोबर स्वकियांशी झुंजावे लागणार आहे.

केजमध्ये दुसरे तयार
सध्याच्या केज मतदारसंघातील विडा, नांदूर, नेकनूर हा भाग पूर्वीच्या चौसाळा मतदारसंघातला आहे. त्यामुळे नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा पक्षातले नेते असले तरी या भागात क्षीरसागरांची ताकद असल्याने त्यांच्याकडून कधीअधिक हस्तक्षेप व्हायचाच. पण, अलीकडे मुंदडा - क्षीरसागरांत पॅचअप झाले असले तरी मुंदडांची डोकेदुखी थांबेलच असे नाही. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे समर्थकांसाठी आग्रह धरू शकतात. तर सभापती बजरंग सोनवणे आतापर्यंत तरी मुंदडांना नेता मानायला तयार नाहीत. त्यातूनही काय मार्ग निघतो यावर सर्व अवलंबून आहे.

माजलगावात रोजच एक नाराज
माजलगाव मतदारसंघात पक्षाची सूत्रे प्रकाश सोळंकेकडे असल्याने प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यावर एक नेता नाराज होतो. मोहन जगतापांनी आता आघाडीच्या माध्यमातून थेट आव्हान दिल्यानंतर त्यांनी सभापती अशोक डकांना जवळ केले. पण, पालिका निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याने आता नितीन नाईकनवरेही नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना इतक्‍या दिवस दिलेल्या विविध पदांचाही त्यांना विसर पडतो की काय, अशी चर्चा आहे. 

आष्टी - परळीत नाही इतरांना वाव
आष्टीत माजी मंत्री सुरेश धस यांचे पक्षात एकहाती वर्चस्व असल्याने त्यांना केवळ विरोधकांशी दोन हात करायचे आहेत. शिरूर भागात क्षीरसागर व पंडितांची थोडीबहुत ताकद असली तरी यावेळी त्यांना स्वत:चेच निस्तरायचे पडल्याने त्यांच्याकडून काही खेळ्या होण्याची शक्‍यता नाही. परळीतही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पक्षात स्पर्धक किंवा विरोधक नाहीत. मागच्या निवडणुकीतील वचपा काढण्याची त्यांना यावेळी चांगली संधी आहे. पण, त्यांनी केजमध्ये जास्तच हस्तक्षेप केला तर जुन्या अंबाजोगाई मतदारसंघातील भागात मुंदडांकडून त्याचा हिशेब होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com