अंधारात केले जातेय राखेचे प्रदूषण

health issue creat in Power Station of Paras
health issue creat in Power Station of Paras

पारस औष्णिक विद्युत केंद्र परिसरात जीव गुदमरताेय, ईएसपी यंत्रणा ठेवली जातेय बंद

अकोलाः पारसच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या दोन थर्मल पॉवर प्लांटमधून निघणाऱ्या फ्लाय ॲशमुळे (राख) परिसरातील दहा ते बारा गावातील 15 हजार नागरिकांच्या जीवाला धोका आहे. अंधारात ‘अर्थ’कारणासाठी ईएसपी सिस्टिम काही तासांसाठी बंद ठेवून यंत्रणेकडूनच राखीचे प्रदूषण केले जात आहे. तर, सरपंच संघटनेने तक्रार करून त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हा प्रशासनानेही कानाडोळा करीत आपल्या अकार्यक्षमतेचा पुरावा दिला आहे.

पारसच्या औष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत दोन थर्मल पॉवर प्लांट चालवल्या जातात. विद्युत निर्मिती प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात फ्लाय ॲश बाहेर पडत असते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी इलेक्ट्रो स्टॅटीक पेसीपेटर (इएसपी कंट्रोल सिस्टिम) यंत्रणा कार्यान्वित आहे. या राखीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ॲश हॅंडलींग प्लांट विभागाकडे आहे. ईएसपी सिस्टिम सुरूच ठेवायला पाहिजे, असा नियम आहे. मात्र लॉगबुकवर यंत्रणा सुरूच दाखवून दर एका तासाने मात्र यंत्रणा काही मिनिटांसाठी बंद करण्यात येते. अशाप्रकारे 80 मिनिट मशिन बंद ठेवून प्रशासनाची तर दिशाभूल केली जातच आहे. शिवाय, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. दिवसा धूर दिसतो, त्यामुळे रात्री अंधाराचा फायदा घेवून हा प्रकार केला जात आहे. फ्लाय अॅश आणि दुर्गंधीयुक्त पाण्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वायू व जलप्रदूषण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याशिवाय शेतीवर सुद्धा दुरगामी परिणाम झाला आहे. दमा, कॅन्सर, तत्वारोगसारखे गंभीर आजार नागरिकांमध्ये बळावले आहेत. शिवाय नदी, नाल्यामध्ये मिसळणाऱ्या दूषित पाण्याने भुगर्भाचाही धिंगाणा सुरू केला आहे. या सर्व प्रकाराबाबत नागरिकांनी जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई तर सोडा साधी चौकशी देखील करण्याचे सोयरसूतक अधिकाऱ्यांनी दाखवले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

या गावांना धोका
पारस, धानोरा, जोगलखेड, मनारखेड, कोळासा, सातरगाव, कसुरा यासह इतर गावांना धोका निर्माण झाला आहे.

सरपंच संघटनेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
पारस येथील माजी सरपंच संतोष दांदळे यांच्या नेतृत्वात परिसरातील सरपंचांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे तक्रार केली होती. याशिवाय त्यांनी कार्यकारी अभियंत्याची सुध्दा भेट घेवून प्रकार लक्षात आणून दिला होता. मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

निवासस्थाने भक्ष्यस्थानी !
औष्णिक विद्युत केंद्र परिसरात काही महिन्यापूर्वीच निवासस्थाने बांधण्यात आलीत. ही निवासस्थाने भक्ष्यस्थानी सापडली आहेत. याठिकाणी 24 इमारती असून, यामध्ये 264 क्वॉर्टर्स आहेत.

कोण काय म्हणाले?
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी नियमित दरमहा औष्णिक विद्युत केंद्रात भेट देत असतात. प्रकाराची पाहणी करून निश्चित कारवाई केली जाईल.
- राहूल मोटे (नियंत्रण अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ)

औष्णिक विद्यूत केंद्रामार्फत हाेणाऱ्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीत तक्रार केली हाेती. शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही निवेदन दिले हाेते. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.
- संतोष दांदळे, माजी सरपंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com