लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; खरीपाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

जळकोट - तालुक्‍यात (जि. लातूर) शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जळकोट मंडळात 75 मिमी तर घोणसी मंडळात 24 मिमी पावसाची नोद झाली आहे.

जळकोट - तालुक्‍यात (जि. लातूर) शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जळकोट मंडळात 75 मिमी तर घोणसी मंडळात 24 मिमी पावसाची नोद झाली आहे.

तालुक्‍यातील बोरगाव येथील ब्रम्हादेवाचे मंदिर पाण्याखाली गेले असून आजुबाजूच्या शेतात पाणी शिरल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील चेरा गावातून जाणाऱ्या तलावाच्या नाल्याचे पाणी दलित वस्तीत पाणी शिरल्याने तीस घराचे नुकसान झाले आहे. डोगरकोनाळी येथील साठवण तलावाच्या सांडव्याचे पाणी गावात शिरल्याने गावातील महिला नागरिकांना रात्र मंदिरात जागून काढावी लागली. तिरुका येथे तिरु नदीवरील पुलावरून दोन फुट पाणी जात आहे. येथील दोन म्हशी पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. तर हाळदवाढवणा येथील साठवण तलावाने पाण्याची पातळी ओलांडली असून येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने सहा तास वाहतूक थांबली होती. जळकोट पाझर तलाव ओव्हरफुल झाल्याने फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. होकर्णा येथील तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात सांडव्यातुन वाहत असल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. तहसीलदार शिवनंदा लगडापुरे यांनी मंडल अधिकारी, तलाठी यांना आदेश देऊन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने तातडीने पाहणी करुन पंचनामे करावे अशी मागणी होत आहे.

मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन
मराठवाड्यात पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले असून लातूरसह नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. जळकोटसह चाकूर, निलंगा, रेणापूर, अंबाजोगाई, माजलगाव, तुळजापूर, उस्मानाबाद, भूम तालुक्‍यात पावसाचा जोर सुरू आहे.

Web Title: heavy rain in Marathwada