महामानवावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

लातुरात आंबेडकर जयंती उत्साहात : अभिवादनासाठी जनसागर लोटला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.Sakal

लातूर - येथे उभारण्यात आलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७२ फूट उंच पुतळ्यावर जयंतीनिमित्त हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी तसेच जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट संपल्याने या वर्षीच्या जयंती उत्सवात उत्साहाला उधाण आले होते. येथील खासदार सुधाकर शृंगारे आणि शंकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर उभारण्यात आलेल्या ७२ फूट उंच पुतळ्यावर जयंतीनिमित्त दुपारी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी उपस्थित आंबेडकर प्रेमी जनतेने जय भीमचा नारा देत सारा परिसर दुमदुमून सोडला. लातुरच्या डॉ. बाबसाहेब आंबेडकर पार्कवर असलेल्या पुतळ्यावर गुरुनाथ मगे, संतोष सूर्यवंशी, संजय दोरवे यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसून पुष्पवृष्टी केली तर अहमदपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दिलीप देशमुख, योगेश गोरे, केदार कोथिंबीरे यांनी पुष्पवृष्टी केली. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी हा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय होता. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यावरची पुष्पवृष्टी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या या संकल्पनेचं सर्वत्र स्वागत होत होते. या कार्यक्रमाला खासदार शृंगारे व त्यांचे कुटुंबिय तसेच उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान मध्यरात्री या ठिकाणी नेत्रदीपक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दरम्यान सकाळपासून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यात माजीमंत्री दिलीपराव देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवनाथ आल्टे, ॲड. व्यंकट बेद्रे, मकरंद सावे, चंद्रकांत चिकटे आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. उंच पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी देखील गर्दी होती. सायंकाळनंतर गर्दी वाढत गेली. सायंकाळपासून शहराच्या विविध भागातून मिरवणुकींना सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका चालल्या. तरुणात मोठा उत्साह होता. वेगवेगळ्या गाण्यावर तरुणाई थिरकत होती. जय भीमचा नाराही मोठा होता. हातात निळे झेंडे, कपाळाला जय भीमची पट्टी लावून अनेक तरुण मिरवणुकामध्ये सहभागी झाले होते. दोन वर्षानंतर साजऱ्या होणाऱ्या जयंतीचा उत्साह मोठा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com