भरदुपारी घराबाहेर जाताय, थांबा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

लातूर - गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यातील तापमानात वाढ होत आहे. येत्या आठवडाभर तापमान ४० डिग्री अंशांवर राहण्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शहरात दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट राहत आहे.

जिल्ह्यात एप्रिलचे पहिले काही दिवस तापमान सामान्य राहिले. सलग सहा दिवस तर पावसाळी वातावरण तयार झाले होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवली नाही; पण गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. सकाळी सातपासूनच उन्हाची तीव्रता आहे. दुपारच्या वेळी तर ही तीव्रता अधिक वाढत आहे. त्यामुळे लातूरकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या वेळी तर रस्त्यांवर शुकशुकाट राहत आहे. या उन्हाचा लहान मुले, वृद्धांना अधिक त्रास होत आहे. दिवसभर कडक ऊन राहिल्याने सायंकाळी सहा-सातपर्यंत त्याच्या झळाही सहन कराव्या लागत आहेत.

उन्हाच्या काहीलीने त्रस्त नागरिक पैसे खर्चून जलतरण तलावावरही गर्दी करीत आहेत. सध्या लातुरात ४० डिग्री अंश सेल्सिअस तापमान आहे. येणारा आठवडाभर असेच तापमान राहणार आहे. त्यात शनिवारी व रविवारी तर ४१ डिग्री अंश सेल्सिअसवर हे तापमान जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागारिकांनी उन्हात फिरताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Web Title: high temperature in latur