हिंगोली जिल्‍ह्‍यात सिंचनाची १७७ कोटी रुपयांची कामे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

राज्‍यपालांनी सिंचन अनुशेषासंदर्भात काढलेले पत्र अत्‍यंत महत्‍वाचे असून या आधारावर पुढील काळात जिल्‍ह्‍यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. - आमदार तान्‍हाजी मुळकुळे

हिंगोली - जिल्‍ह्‍याच्‍या सिंचन अनुशेषाच्‍या संदर्भात १७७ कोटी रुपयांची तरतूद करून राज्‍य सरकारने आराखडे सादर करावेत असे आदेश राज्‍यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी (ता.१८) काढले आहेत.

जिल्‍हयाच्‍या सिंचनाचा अनुशेषाचा आकडा अखेर राज्‍य सरकारने मान्य केल्‍याने गेल्‍या सतरा वर्षापासून सुरु असलेल्‍या सिंचनाच्‍या आंदोलनाला न्याय मिळाल्‍याची भावना व्यक्‍त होत आहे. हिंगोली जिल्‍ह्‍याच्‍या निर्मितीनंतर राज्‍य सरकारने जिल्‍हयाच्‍या सिंचनाची आकडेवारी परभणी जिल्‍ह्‍यापासून वेगळी केली नव्‍हती. या उलट परभणीची आकडेवारी जिल्‍ह्‍यावर लादून सिंचनाचा कोणताही अनुशेष नसल्‍याचे नाटक पाटबंधारे खात्‍याने उभे केले होते. या प्रकारात काही काळ राज्‍य सरकारची दिशाभूल पाटबंधारे खात्‍याने केली होती. दुसरीकडे शासनाकडून जिल्‍ह्‍याचा सिंचन अनुशेष न काढताच जिल्‍ह्‍यातील पाणीस्‍त्रोताच्‍या आधारावर लगतच्‍या जिल्‍ह्‍यांना सिंचनाचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्‍न सुरु झाले. मात्र, त्‍यालाही जिल्‍ह्‍यातून विरोध सुरु झाला. या विरोधातून सापळी धरण समितीने धरणाचे काम पूर्णपणे बंद करून टाकले. त्‍यानंतर आधी हिंगोली जिल्‍हयाचा सिंचन अनुशेष काढा व नंतर दुसऱ्या जिल्‍ह्‍याला पाणी द्या अशी भूमिका मांडली. तरीही सिंचनाची आकडेवारी स्‍वतंत्र केली नाही.

अखेर या सर्व प्रश्नांवर भाजपचे आमदार तान्‍हाजी मुटकुळे यांनी थेट राज्‍यपालांकडे जावून न्याय मागितला. गेल्‍या अडीच वर्षापासून आमदार मुटकुळे यांनी राज्‍यपालांकडे सतत पाठपुरावा केल्‍याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्‍याची दखल घ्यावी लागली. पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी देखील आमदार मुटकुळेंना मदत करत जिल्‍ह्‍याच्‍या सिंचनाचे वास्‍तव शासनासमोर मांडले. अखेर राज्‍यपाल कार्यालयाने ता. १८ रोजी राज्‍य शासनाला पत्र देवून याबाबत सिंचन अनुशेष दूर करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. जिल्‍ह्‍याचा पंधरा हजार हेक्‍टरचा सिंचन अनुशेष दूर करण्याच्‍या दृष्टीने १७७ कोटी रुपयांचे आराखडे तयार करावेत असे या पत्रात म्‍हटले आहे. राज्‍यपालांनी पंधरा हजार हेक्‍टर अनुशेषाचा आकडा मांडला तरी प्रत्‍यक्षात हा आकडा ४६ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक असल्‍याचे मानले जाते.

राज्‍यपालांनी सिंचन अनुशेषासंदर्भात काढलेले पत्र अत्‍यंत महत्‍वाचे असून या आधारावर पुढील काळात जिल्‍ह्‍यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. - आमदार तान्‍हाजी मुळकुळे

राज्‍यपालांनी काढलेल्‍या सिंचन अनुशेषाची आकडेवारी काही प्रमाणात कमी आहे. त्‍यामुळे त्‍याचा अभ्यास करून पुढील दिशा ठरवली जाईल. - माजी खासदार ॲड. - शिवाजी माने, जिल्‍हा सिंचन संघर्ष समिती हिंगोली