औंढा नागनाथचे तीन भाविक ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

आंध्र प्रदेशातील आचमपेठजवळ पुलाला धडकली जीप, नऊ जखमी

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्‍यातून तिरुपतीकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या जीपला अपघात होऊन तीनजण ठार, तर नऊजण जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २३) पहाटे चार वाजता घडली. आचमपेठजवळ (आंध्र प्रदेश) जीप पुलाच्या कठड्याला धडकून हा अपघात झाला. औंढा नागनाथ तालुक्‍यातील रूपूर, रूपूर तांडा व सिध्देश्वर कॅम्प येथील बारा भाविक जीपने शनिवारी तिरुपतीच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. 

आंध्र प्रदेशातील आचमपेठजवळ पुलाला धडकली जीप, नऊ जखमी

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्‍यातून तिरुपतीकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या जीपला अपघात होऊन तीनजण ठार, तर नऊजण जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २३) पहाटे चार वाजता घडली. आचमपेठजवळ (आंध्र प्रदेश) जीप पुलाच्या कठड्याला धडकून हा अपघात झाला. औंढा नागनाथ तालुक्‍यातील रूपूर, रूपूर तांडा व सिध्देश्वर कॅम्प येथील बारा भाविक जीपने शनिवारी तिरुपतीच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. 

रविवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांची जीप हैदराबादपासून वीस किलोमीटर अंतरावर आचमपेठ गावाजवळ आली. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने जीप एका पुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातामध्ये जीपच्या डाव्या बाजूचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रूपूर, सिद्धेश्वर कॅम्प व रूपूर तांडा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह गावाकडे आणण्यात आले नव्हते.

मृतांची नावे -
रूपूर तांडा येथील संतोष राठोड (वय २२), रूपूर येथील राजेश सांगळे (वय २२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर साळणा येथील वाहनचालक नवनाथ दराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

जखमींची नावे -
रामदास सांगळे, परसराम सांगळे, संतोष बांगर (रा. सिद्धेश्वर कॅम्प), गजानन सांगळे, गजानन नागरे, बालाजी नागरे, बंडू मुंढे (रा. रूपूर), वैजनाथ आडे (रा. रूपूर तांडा), नंदू घोडके (रा. औंढा नागनाथ).

कर्णप्रयाग अपघातातील महिला भाविकांवर अंत्यसंस्कार

औरंगाबाद - उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग येथे झालेल्या अपघातात दोन भाविक महिलांचा शुक्रवारी (ता. २३) मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह डेहराडून - दिल्लीमार्गे औरंगाबादला विमानाने रविवारी (ता. २३) आणण्यात आले. त्यानंतर पाडळी (ता. फुलंब्री) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

भागाबाई तुळशीराम साबळे (वय ६०) व ठगाबाई अवचितराव साबळे (वय ६०, दोघी रा. पाडळी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) अशी मृत भाविक महिलांची नावे आहेत. त्यांच्यासह पाडळी, निधोना येथील पस्तीस भाविकांचा जत्था चारधाम यात्रेसाठी गेला होता. कर्णप्रयाग येथे बस उलटून भागाबाई व ठगाबाई साबळे यांचा मृत्यू झाला, तर काही भाविक जखमी झाले. दोघींचे मृतदेह डेहराडूनहून दिल्लीला नेण्यात आले. रविवारी सायंकाळी पाच वाजता विमानाने मृतदेह औरंगाबादला आणण्यात आले.

रात्री आठ वाजता विमान पोचल्यानंतर त्यांना विमानतळावर श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, आमदार सुभाष झांबड, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, फुलंब्री बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी आमदार अब्दुल सत्तार यांनी विमानतळावर भेट दिली. विमानतळावरून त्यांचे मृतदेह मूळ गावी पाडळी येथे नेण्यात आले. त्यांच्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.