हिंगोलीचं बसस्थानक बांधायला कुणी तयारच नाही..!

प्रकाश सनपूरकर
शुक्रवार, 2 जून 2017

ई टेंडरींग पध्दतीने या निविदा काढण्यात आल्या. यामध्ये बसस्थानकाच्या इमारतीमध्ये सतरा गाळे, वाहक व चालकांची निवासाची सोय, प्रवाशासाठी अधिक आसनाची सोय, कँटीन, फळ विक्री, बूकस्टॉल व इतर अनेक प्रकाराच्या सोयी त्यामध्ये असणार आहे. निविदाची प्रसिध्दी ऑनलाईन झाल्यानंतर एकाही कंत्राटदारने त्याला प्रतिसादच दिला नाही.

हिंगोली : शहरातील मोडकळीस आलेल्या बसस्थानकाच्या इमारत बांधकामाच्या निविदेला कंत्राटदारांनी ई टेंडरींगमध्ये प्रतिसादच दिला नसल्याने नवीन बसस्थानक होणार की नाही यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाच्या देखभालीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. इमारतीतमधील फरशी खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. तसेच छताला जाळे झाले असून पंखे चालत नाहीत. त्यासोबत बसण्यासाठी आसनाची सोयदेखील नाही. बसस्थानकाच्या आवारात फरशी नसल्याने मोठे खड्डे होऊन त्यात पावसाचे पाणी साचत आहे. अनेक वेळा प्रवाशांना बसपर्यंत जाण्यासाठी खड्ड्यातील पाण्यातून चालावे लागत आहे. या सर्व प्रकाराला प्रवासी कंटाळून गेले आहेत. याशिवाय घाण व कचऱ्याचा त्रास तर भयंकर आहे. मात्र सर्व प्रश्‍नावर नवीन बसस्थानक होणार आहे एवढे एकमेव उत्तर एसटीचे अधिकारी देत आहेत.

दुसरीकडे सुरुवातीला एसटीच्या अधिकाऱ्यांनी बसस्थानक बांधणीचा प्रस्ताव पाच कोटीचा होता. म्हणून खर्चिक असल्याने नाकारला गेला. त्यानंतर पुन्हा तीन कोटी एकोणीस लाख रुपयाचा नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला. या सर्व प्रकारात एक ते दीड वर्षांचा कालावधी गेला. त्यानंतर आता एसटीने तीन कोटी एकोणीस लाख रुपयांच्या निविदा काढल्या.

ई टेंडरींग पध्दतीने या निविदा काढण्यात आल्या. यामध्ये बसस्थानकाच्या इमारतीमध्ये सतरा गाळे, वाहक व चालकांची निवासाची सोय, प्रवाशासाठी अधिक आसनाची सोय, कँटीन, फळ विक्री, बूकस्टॉल व इतर अनेक प्रकाराच्या सोयी त्यामध्ये असणार आहे. निविदाची प्रसिध्दी ऑनलाईन झाल्यानंतर एकाही कंत्राटदारने त्याला प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे एसटी अडचणीत आली आहे. निविदेला प्रतिसाद मिळालाच नाही तर नवीन बसस्थानक होणार तरी कधी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे हिंगोली आगाराचे वार्षीक उत्पन्न बावीस कोटी रुपये असून बसस्थानक उभारणीला प्रतिसाद नसल्याची विसंगत स्थिती झाली आहे. याबद्दल एसटी प्रवाशामध्ये नाराजी पसरली आहे.