हिंगोली जिल्‍ह्‍यात चौथ्या दिवशीही शेतकऱ्याचा संप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

जवळा बाजार येथे रास्‍ता रोको, ताकतोडा, जवळा बुद्रुक येथील आठवडी बाजार बंद

हिंगोली : जिल्‍हाभरात सुरू असलेल्या संपास रविवारी (ता.४) जवळा बाजार येथे शिवसेनेतर्फे रास्‍ता रोको आंदोलन, ताकतोडा, जवळा बुद्रुक येथील आठवडे बाजार बंद करून रस्‍त्‍यावर भाजीपाला दुध टाकून शासनाच्या शेतकरी धोरणाचा निषेध करुन शेतकऱ्याच्या संपास पाठीबा जाहीर केला आहे.

ताकतोडा येथील आठवडी बाजार बंद
केंद्रा बुद्रुक ः सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे रविवारी (ता.४) भरणारा आठवडी बाजार बंद ठेवून शेतकऱ्यांनी सुरू असलेल्या शेतकऱ्याच्या राज्यव्यापी संपात सहभाग घेतला. ताकतोडा येथे दर रविवार सकाळी सात ते सकाळ अकरा वाजे पर्यंत बाजार भरविला जातो.

येथील शेतकऱ्यांनी सध्या शेतकऱ्याचा राज्यव्यापी संप सुरू असल्याने या संपास पाठीबा जाहीर करून शेतकऱ्याच्या संपास पांठीबा देवून आठवडी बाजार बंद करून भाजीपाला रस्‍त्‍यावर टाकून संपात सहभाग घेतला. या वेळी माजी सरपंच विठ्ठल सावके, उमेश सावके, माधवराव सावके, आमोल सावके,गजानन सावके, प्रकाश मसुडकर, गजानन नवघरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.