हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

कोल्हापूरी बंधारेही कोरडेच
जिल्ह्यातील चिंचखेडा कोल्हापूरी बंधाऱ्यामध्ये ३४ टक्के पाणीसाटा असून खेर्डा कोल्हापूरी बंधाऱ्यामध्ये पाणीसाठाच नसल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील २७ लघु तलावांमध्ये एकूण ४.३४ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा आहे. मागील वर्षी या लघु तलावांमध्ये ४४.८८७ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा होता तर २०१५ मध्ये या तलावांमधून १०.४७९ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा होता.

हिंगोली : जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या केवळ ३२ टक्केच पाऊस झाला असून भर पावसाळ्यात २७ पैकी १५ लघु तलाव जोत्याखाली आले आहेत. त्यामुळे आता आगामी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची दाहकता वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जिल्हयात मागील पंचेविस दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागात हलका पाऊस पडू लागला आहे. मात्र, यापावसाचा फारसा परिणाम भुगर्भातील पाणी पातळीवर होणार नसल्याचे चित्र आहे. भर पावसाळ्यातही भुगर्भातील पाणी पातळी वाढीलच नाही. त्यामुळे आगामी काळात भिषण पाणी टंचाईचे संकेत मिळू लागले आहेत.

जिल्हयात असलेल्या २७ लघु तलाव मागील वर्षी या कालावधीत काठोकाठ भरले होते. मात्र, यावर्षी १५ लघु तलाव भर पावसाळ्यात जोत्याखाली आले आहेत. यामध्ये पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, हातगाव, सवना, मरसुल, वाळकी, सेंदूरसना, पुरजळ, केळी, कळमनुरी, देवधरी, राजवाडी आदी तलावांचा समावेश आहे. सदर तलाव जोत्याखाली असल्यामुळे तलावाच्या परिसरातील पाणी पातळी वाढलीच नाही. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर होणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, नऊ तलावात पंचेविस टक्‍क्‍यांपर्यंतच पाणी असून यामध्ये दांडेगाव (एक टक्का), बोथी (दोन टक्के), वंजारवाडी व औंढा तलाव (प्रत्येकी तेरा टक्के), काकडदाभा (एक टक्का), सुरेगाव, घोरदरी (प्रत्येकी तीन टक्के), पिंपरी (२१ टक्के), पेडगाव (सहा टक्के) आदी तलावांचा समावेश आहे. याशिवाय पंचेविस ते पंन्नास टक्केमध्ये केवळ तीन तलाव असून यामध्ये पिंपळदरी (४८ टक्के), भाटेगाव (४१ टक्के) तर सवड तलावात (तीस टक्के) पाणी साठा आहे. भर पावसाळ्यात तलाव भरलेच नसल्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यासाठी प्रशासनाला आता पासूनच खबरदारीच्या उपाय योजना हाती घ्याव्या लागणार असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूरी बंधारेही कोरडेच
जिल्ह्यातील चिंचखेडा कोल्हापूरी बंधाऱ्यामध्ये ३४ टक्के पाणीसाटा असून खेर्डा कोल्हापूरी बंधाऱ्यामध्ये पाणीसाठाच नसल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील २७ लघु तलावांमध्ये एकूण ४.३४ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा आहे. मागील वर्षी या लघु तलावांमध्ये ४४.८८७ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा होता तर २०१५ मध्ये या तलावांमधून १०.४७९ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा होता.