गर्भवतीस बाजेवरून नेले तीन किलोमीटर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

हिंगोली - कळमनुरी तालुक्‍यातील करवाडीच्या गावकऱ्यांना गर्भवतीस दवाखान्यात नेण्यासाठी रविवारी पुन्हा एकदा तीन किलोमीटर पायपीट करावी लागली. रस्त्याअभावी घडलेली ही पंधरवड्यातील दुसरी घटना आहे.

हिंगोली - कळमनुरी तालुक्‍यातील करवाडीच्या गावकऱ्यांना गर्भवतीस दवाखान्यात नेण्यासाठी रविवारी पुन्हा एकदा तीन किलोमीटर पायपीट करावी लागली. रस्त्याअभावी घडलेली ही पंधरवड्यातील दुसरी घटना आहे.

करवाडी गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णांना उपचार मिळणेही कठीण झाले आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी एका गर्भवतीस उपचारासाठी बाजेवरून तीन किलोमीटरपर्यंत न्यावे लागले होते. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. आता तरी रस्त्याचा प्रश्‍न सुटेल, अशी अपेक्षा होती; मात्र कोणीही या बाबीची दखल घेतली नाही. रविवारी पुन्हा गावातील ध्रुपताबाई कोठे या महिलेस प्रसूती वेदना होऊ लागल्या होत्या. गावकऱ्यांनी 108 या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका आणण्याची विनंती केली; मात्र रुग्णवाहिका आखाडा बाळापूर येथे असून, दोन तास लागतील असे सांगण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांनी पुन्हा 102 या क्रमांकावर संपर्क साधला असता, पाऊण तास हा क्रमांक व्यग्र होता. संपर्क झाल्यानंतर गावात रस्ता नसल्याने रुग्णवाहिका येऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. दरम्यान, महिलेची प्रकृती गंभीर होत असल्याने गावकऱ्यांनी नांदापूरपर्यंत रुग्णवाहिका आणण्यास चालकाला विनंती केली. त्यानुसार महिलेला बाजेवर टाकून तीन किलोमिटरपर्यंत नेण्यात आले.

सव्वा तासाची पायपीट
महिलेला वेळेत उपचार मिळावेत यासाठी गावकऱ्यांनी त्यांना बाजेवर टाकून तीन किलोमीटर पायपीट केली. साडेपाच वाजता गावातून निघालेले गावकरी पावणेसात वाजता रुग्णवाहिकेजवळ पोचले. तेथून पुढे हिंगोलीला महिलेला नेण्यात आले. दरम्यान, गेल्या पंधरवड्यातील ही दुसरी घटना असून आता तरी रस्ता मिळेल काय, असा सवाल गावकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.

Web Title: hingoli news pregnent women, road