हिंगोलीत मध्यवर्ती बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

शिवसेना पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

हिंगोली : जिल्हयात कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द कराव्यात या मागणीसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी (ता.10) सकाळी आकरा वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन केले. या आंदोलनामुळे बँकेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते. तर बँकेसमोर वाजणारा ढोल चर्चेचा विषय बनला होता.

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या घरासमोर जाऊन वसुलीच्या नोटीस लावत होते. त्यानंतर आता शासनाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ केल्यानंतर शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हयातील सर्व बँकांसमोर लावण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

या मागणीसाठी आज सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा शिवरानी नरवाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर, युवा सेना जिल्हा प्रमुख दिलीप घुगे, बाजीराव सवंडकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, नंदकिशोर खिल्लारे, डी. वाय. घुगे, फकीरा मुंडे, भानुदास जाधव तालुका प्रमुख कडूजी भवर, अशोक नाईक, परमेश्‍वर मांडगे, राम कदम, संदीप मुदीराज, संतोष सारडा, बाजार समितीचे सभापती रामेश्‍वर शिंदे पाटील केसापूरकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उध्दवराव गायकवाड, मुन्ना यादव, डॉ. रमेश शिंदे, पंचायत समिती सदस्य अजय सावंत, रामराव घुळघुळे, प्रताप काळे, गणेश शिंदे यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली.

शहरातील प्रमुख मार्गावरून सकाळी आकरा वाजता रॅली मध्यवर्ती बँकेसमोर आल्यानंतर तेथे ढोल बजाव आंदोलन सुरु केले. सुमारे एका तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे बँकेचे कामकाज विस्कळीत झाले होते. त्यानंतर बँक प्रशासनाकडे निवेदन सादर करून कर्जमाफ झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या जिल्ह्यातील सर्व शाखांसमोर लावाव्यात अशी मागणी करण्यात आली. दरम्यान बँकेसमोर ढोल वाजविला जात असल्याचा प्रकार नागरीकांसाठी चर्चेचा विषय बनला होता.