हॉकीस्टिकने मारहाण करून तरुणाला उड्डाणपुलावरून फेकले! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - प्लॉटच्या रजिस्ट्रीवरून दोघांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाला उड्डाणपुलावरून फेकले. ही खळबळजनक घटना गुरुवारी (ता. नऊ) रात्री पावणेदहाच्या सुमारास टाऊनहॉल येथील उड्डाणपुलावर घडली. यातील जखमीची प्रकृती गंभीर असून दुसरा किरकोळ जखमी आहे. 

औरंगाबाद - प्लॉटच्या रजिस्ट्रीवरून दोघांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाला उड्डाणपुलावरून फेकले. ही खळबळजनक घटना गुरुवारी (ता. नऊ) रात्री पावणेदहाच्या सुमारास टाऊनहॉल येथील उड्डाणपुलावर घडली. यातील जखमीची प्रकृती गंभीर असून दुसरा किरकोळ जखमी आहे. 

पोलिस निरीक्षक सलीम शेख यांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी सोहेल समीर बावजीर (रा. नेहरूनगर, कटकट गेट) व अब्दुल लतिफ यांच्यात प्लॉटचा व्यवहार झाला. सोहेल यांचा प्लॉट अब्दुल लतीफने विकत घेत, त्यांना अडीच लाख रुपये दिले; पण एक लाख रुपये बाकी असल्याने सोहेल बावजीर यांनी रजिस्ट्री करून दिली नव्हती; पण अब्दुल लतीफने रजिस्ट्रीसाठी चंग बांधला. यातून त्यांच्यात वाद सुरू झाला. अब्दुल लतीफ, त्याचा नातेवाईक गुड्डू ऊर्फ जमीर यांनी सोहेल यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. यात सोहेल व त्याचे वडील जखमी झाले. 

दरम्यान, सोहेल यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात धाव घेत मारहाणीची तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी घाटीत पाठविले. मारहाण झाल्याचे कळताच पाठोपाठ सोहेल यांचे मित्र शेख कलीम शेख इस्माईल घाटीत गेले. उपचारानंतर सोहेल व कलिम हे दुचाकीने घरी जाण्यास निघाले. त्यावेळी टाऊन हॉल उड्डाणपुलावर परत अब्दुल लतीफ व त्याच्या सहकाऱ्यांनी दोघांना अडवले. त्यांनी दोघांना हॉकीस्टिकने जबर मारहाण सुरू केली. प्रतिकार केला असता, त्यांनी कलीम यांना बेदम मारहाण करून उड्डाणपुलावरून खाली फेकले. यात त्यांच्या डोक्‍याला जबर इजा झाली. दरम्यान, नागरिकांनी धाव घेतली. बेगमपुरा पोलिस घटनास्थळी आल्यानंतर जखमीला घाटीत हलवण्यात आले. 

या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या संशयितांवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. कलिम शेख यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपनिरीक्षक जे. ए. कुलकर्णी तपास करीत आहेत. 

जखमीची ठाण्यात धाव 
उड्डाणपुलावरून सहकाऱ्याला फेकल्याचे पाहून सोहेल हे जखमी अवस्थेतच बेगमपुरा पोलिस ठाण्यात धावत गेले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.