उमरगात वादळी वाऱ्याने घरं, दुकानांचे नुकसान

जावेद इनामदार
रविवार, 27 मे 2018

केसरजवळगा- बेळंब रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने रविवारी (ता. 27) सकाळपासून बससेवा व खासगी वाहतुक बंद आहे.
 

केसरजवळगा - वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह शनिवारी (ता. 26) रात्री अवकाळी पाऊस झाला. वीज पडून एक म्हैस दगावली. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील व दुकानांवरील पत्रे उडून माल भिजल्याने लाखोंचे नुकसान झाले. केसरजवळगा- बेळंब रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने रविवारी (ता. 27) सकाळपासून बससेवा व खासगी वाहतुक बंद आहे.

वादळी वारे आणि विजांचा कडकडाट शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू झाला. त्यानंतर 7 च्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता. या पावसात ख्वाजासाब इनामदार यांच्या शेतात वीज पडून म्हैस ठार झाली. गावातील बाबासाहेब डांगे यांच्या सिमेंट दुकानावरील पत्रे उडून सिमेंट भिजून लाखोंचे नुकसान झाले. अय्युब इनामदार यांच्या कपड्याच्या दुकानावरील पत्रे उडून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले लाखो रूपयांचे कपडे भिजून नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून घरातील साहित्याचे नुकसान झाले. बसथांबा परिसरातील दावलमलिक दर्ग्यावरील संपूर्ण पत्र्याचे शेड लोखंडी अँगलसह उडून गेले. आलुर वीज उपकेंद्राला वीजपुरवठा करणारे उच्च व कमी दाबाचे जवळपास 30 खांबे उखडून पडल्याने सांयकाळी साडेसहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा रविवारी दुपारी एकपर्यंत बंद होता. केसरजवळगा, आलूर गावांचा वीजपुरवठा बंद होता. कोथळी, आलूर, केसरजवळगा (ता. उमरगा) या भागांतील विजेचे खांब पडले आहेत. दुरूस्तीचे कामे सुरू आहेत, अशी माहिती मुरूम येथिल महावितरण ग्रामीण कार्यालयातील सहायक अभियंता एस. एन. वाघमारे यांनी दिली. रस्त्यावरील झाडे हटवण्याचे काम ग्रामपंचायतीने सुरू केले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Homes Shops Damage in Umarga because of Thunderstorm