मुख्यमंत्र्यांना अजून किती आत्महत्या हव्यात?

sangharsh yatra
sangharsh yatra

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की योग्य वेळ आली, की कर्जमाफी करू. शेतकऱ्यांच्या अजून किती आत्महत्या झाल्या पाहिजेत? 20 हजार आत्महत्यांची वाट पाहताय का? की पंचांग पाहून कर्जमाफी करणार आहात? असे अनेक सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आणि सरकारवर टीकेची झोड उठवली. हे सरकार गांडुळासारखे दुतोंडी असल्याचा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांची काढलेली कर्जमाफी संघर्ष यात्रा शनिवारी (ता. 1) जालना, औरंगाबाद, बीड जिल्ह्यात गेली. शेतकऱ्यांशी संवाद आणि जाहीर सभा घेत ही संघर्ष यात्रा रात्री लातूरकडे रवाना झाली. औरंगाबादमधील आमखास मैदानावर झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. 

चव्हाण म्हणाले, "आघाडी सरकारमधील पक्षांत असलेल्या मतभेदांमुळे भाजपचे फावले आहे. देशात, राज्यातील सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्‍न माहीत नाहीत. 2014 च्या निवडणुकीतील आकडेवारीनुसार देशात 71 टक्‍के; तर राज्यात 72 टक्‍के जनतेने भाजपच्या विरोधात मत दिले आहे. विरोधक एक नव्हते. भाजपने प्रलोभने दाखवली, त्याला लोक भुलले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला दिल्लीला गेले. मात्र पंतप्रधानांऐवजी ते अर्थमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्री कर्जमाफी करणार नाहीत, असे सांगत होते. पंतप्रधान उत्तर प्रदेशात कर्जमाफीची घोषणा करू लागले तेव्हा हे मुख्यमंत्री नरमले आहेत. योग्य वेळेचे गाजर दाखवत आहेत.'' 

दुतोंडी सरकार : पवार 
मूठभर उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज काही मिनिटांत माफ करता, ते काय तुमचे जावई आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्‍य नसल्याचे सांगता. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर निवडून आलात, तेच तुम्हाला उलथून टाकतील, अशा शब्दांत हल्ला चढवत अजित पवार यांनी भाजप म्हणजे गांडुळासारखे दुतोंडी असल्याचा टोला लगावला. आमची आमदारकी गेली तरी बेहत्तर; मात्र आम्ही शांत बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

'शेतकऱ्याला ताठ मानेने उभ राहता यावं म्हणून संघर्ष'

औरंगाबाद : निवडणुकीपूर्वी सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन देणारे, शेतीमालाला खर्चाला परवडणार दर देऊ म्हणणारे सत्तेवर आल्यानंतर सारं विसरलेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न उभा ठाकलाय. हे चित्र बदलविण्यासाठी व माझा शेतकरी ताठ माननं उभा राहावा म्हणून संघर्ष यात्रा काढली आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. 

औरंगाबाद येथे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने शनिवारी (ता. 1) आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी, यात्रेचे संयोजक जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, नसिम सिद्दिकी, आमदार अब्दूल सत्तार, भाऊसाहेब चिकटगावकर, कल्याण काळे आदींची उपस्थिती होती. 

पवार म्हणाले, की एकीकडे मूठभर उद्योगपतींना काही लाख कोटीची कर्जमाफी देणारे हे सरकार शेतकऱ्यांना काही हजार कोटींची कर्जमाफी देण्यास तयार नाही. आम्ही कर्जमाफी केली तेव्हा शेतकऱ्यांवर उपकार केले नाही, ती आमची जाणीव आणि बांधिलकी होती. आता मात्र तूर खरेदी असो, शेतीमालाचा दर असो, प्रत्येक ठिकाणी शेतकरी उद्‌ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. 

समाजवादी नेते अबू आजमी यांनी थेट शेतकरी प्रश्‍नाला हात घालताना शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असेल, तर दीडपट नुकसानभरपाई सरकारने द्यायला हवी. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com