शेतात कामे करून गाठले यशाचे शिखर

सचिन चोबे
शुक्रवार, 1 जून 2018

सिल्लोड - घरची जेमतेम परिस्थिती असलेल्या भराडी (ता. सिल्लोड) येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या दोन विद्यार्थिनींनी जिद्दीच्या जोरावर बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले.

सिल्लोड - घरची जेमतेम परिस्थिती असलेल्या भराडी (ता. सिल्लोड) येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या दोन विद्यार्थिनींनी जिद्दीच्या जोरावर बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले.

येथील दिव्या साहेबराव खोमणे या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेत ८५.६९ टक्के गुणांसह सरस्वती भुवन प्रशालेतून पहिला क्रमांक मिळविला. परिस्थितीचा विचार न करता ध्येय साध्य करण्यासाठी दररोज सहा तास नियमितपणे अभ्यास केला. त्यासाठी दिव्याने स्वतःचे वेळापत्रक तयार केले होते. घरची अवघी दीड एकर शेती. त्यामध्ये राब-राब राबून जे पदरात पडेल त्यात उदरनिर्वाह करावा लागतो. यातून प्रपंच सांभाळत मुलीला आवडीप्रमाणे शिक्षण देण्याच्या त्यांच्या धडपडीला दिव्याच्या यशाने झळाळी मिळाली आहे. आई शेतावर गेल्यानंतर घरातील सर्व कामे आटोपूनच दिव्याचा अभ्यास सुरू होत असे. तिने नियमितपणे शाळेतील वर्ग केले.

दरमहा होणाऱ्या परीक्षेमध्ये खंड पडू दिला नाही. उलट ज्यात कमी गुण मिळाले त्या विषयाचा अधिक जोमाने अभ्यास केला. चुकांची दुरुस्ती केली. त्यामुळेच यश मिळाले. तिची डॉक्‍टर होण्याची इच्छा असून, पुढील काळातही जिद्दीने ध्येयाकडे वाटचाल करणार असल्याचे दिव्याने सांगितले.

रोहिणीनेही केला गड सर 
रोहिणी विश्‍वनाथ खोमणे हिनेही कठोर परिश्रम घेत बारावीचा गड सर केला आहे. तिने विज्ञान शाखेत ८२.९२ टक्के घेतले. बारावीच्या शैक्षणिक सत्रास सुरुवात झाल्यानंतर लगेच तिच्या वडिलांचे निधन झाले. घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना रोहिणीने सर्व परिस्थितीचा विचार करीत ध्येय साध्य केले आहे. घरची शेती केवळ दोन एकर. यावरच कुटुंबाचा चरितार्थ चालतो. वडिलांचे निधन झाल्यानंतर मात्र रोहिणीलाही शेतीच्या कामाला जावे लागले. शिक्षणाकडे मात्र तिने दुर्लक्ष होऊ दिले नाही. साधे पत्र्याचे घर, मोठा भाऊ देखील मजुरी करणारा अशा हलाखीच्या परिस्थितीत तिने मिळविलेले यश प्रेरणादायी आहे. रोहिणीला वकील होण्याची इच्छा आहे. तिच्या स्थितीचा विचार केल्यास या जिद्दी व होतकरू विद्यार्थिनीचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष साळवे, तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी तिला वेळोवेळी मदतीचा हात दिला.

Web Title: HSC Result rohini khomane divya khomane success motivation