भ्यायला मी काय ब्राह्मण आहे?- मंत्री दिलीप कांबळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

निलंगा "इफेक्‍ट' 
"मी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाषण ऐकले. निलंगा "इफेक्‍ट' इतक्‍या लवकर होईल, असे वाटले नव्हते. आज होळी आहे. त्यामुळे मंत्री जे काही बोलले ते कोणी मनावर घेऊ नये,' असे म्हणत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी श्री. कांबळे यांच्या वक्तव्याबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; पण कार्यक्रमानंतर मात्र याची जोरदार चर्चा होती. 

लातूर - "सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केल्याने आता काहीजण आंदोलन करीत आहेत. माझ्यामागे ही आंदोलने केली जात आहेत. त्यांना भ्यायला मी काय ब्राह्मण आहे? मी मागासवर्गीय आहे. माझ्यासमोर कोणी घोषणाबाजी केली असती, तर त्यांच्या मुस्कटात लगावली असती,' अशी थेट धमकीच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे दिली. कांबळे यांनी असे वक्तव्य केल्याने उपस्थितांत उलटसुलट चर्चा होती. 

सामाजिक न्याय विभागाने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण रविवारी (ता. 12) येथे झाले. या वेळी श्री. कांबळे बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
नांदेड येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शनिवारी (ता. 11) पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर मंत्री व शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. याचा संदर्भ कांबळे यांनी आपल्या भाषणा दिला. ते म्हणाले, की विकासकामात राजकारण करायचे नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. 

गोरगरिबांचे हे सरकार आहे. सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद करण्यात आली आहे. त्यामुळेच बदनामीसाठी आंदोलन केले जात आहे. कार्यक्रम संपल्यानंतर हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्याच्या व्हॉटसऍपवर क्‍लिप फिरवण्यात आल्या. माझ्यासमोर हे आंदोलन झाले असते तर मुस्कटात मारली असती. मी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत वाढलेला कार्यकर्ता आहे. मी घाबरणारा नाही, असे शब्दही श्री. कांबळे यांनी आपल्या भाषणात वापरले. त्यामुळे उपस्थितांत उलटसुलट चर्चा होती. 