हालचाली कधीच्याच, घोषणा आता

अतुल पाटील
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

आयसीटी, तंत्रनिकेतन रूपांतराबाबतचे ‘सकाळ’चे वृत्त ठरले तंतोतंत खरे
औरंगाबाद - इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजीचे (आयसीटी) उपकेंद्र जालना येथे होणार; तसेच राज्यातील सहा तंत्रनिकेतनचे अभियांत्रिकीत रूपांतर होणार याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. यामुळे हालचाली कधीच्याच, घोषणा मात्र आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत असे चित्र आहे.

आयसीटीच्या उपकेंद्रासाठी जालना जिल्ह्यातील मौजे शिरसवाडी येथील दोनशे एकर जमीन महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. ही संस्था तात्पुरत्या स्वरूपात वाल्मी येथे सुरू केली जाईल, असे आयटीसीतर्फे सांगितले जात होते. मात्र, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘उपकेंद्र तत्काळ कुठेही सुरू केले जाणार नाही. दिलेल्या जागेत बांधकाम होऊन साधनसामग्री बसविल्यानंतरच ते सुरू होईल,’ असे स्पष्ट केले. यात औरंगाबाद आणि जालना असा ठिकाणाचा कुठलाही प्रश्‍न नव्हता, चार जागांमधूनच शिरसवाडीची जागा अंतिम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आयसीटी हे अभिमत विद्यापीठ असून, केंद्र सरकारने घोषित केलेल्या क्रमवारीत २३४ विद्यापीठांतून पहिल्या स्थानी असल्याचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

गुणवंत, गरीब विद्यार्थ्यांना शासकीय अभियांत्रिकीत प्रवेश मिळावा, यासाठी शासकीय तंत्रनिकेतनचे अभियांत्रिकीत रूपांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मराठवाड्यातील जालना, लातूरसह सोलापूर, रत्नागिरी, धुळे, यतवमाळ इथेही अभियांत्रिकी महाविद्यालये २०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून सुरू होतील. यामुळे दोन हजार विद्यार्थ्यांना शासकीय अभियांत्रिकीमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे श्री. तावडे यांनी सांगितले. अभियांत्रिकीबाबत ‘सकाळ’ने नेहमीच आवाज उठविला होता. तंत्रनिकेतन रूपांतराच्या हालचाली दीड वर्षापासून सुरू होत्या. सरकारी पातळीवरील कार्यवाही डिसेंबर २०१५ मध्येच पूर्ण झाली होती. मात्र, याची घोषणा या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे.