भारतीय ही एकमेकांना जोडणारी ओळख - रझा मुराद

भारतीय ही एकमेकांना जोडणारी ओळख - रझा मुराद

औरंगाबाद - 'भारतीय ही एकमेकांना जोडणारी ओळख आहे. त्याचाच कित्ता "इंद्रधनुष्य'मधून जोपासला जातो. स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर जिंकणे, हरणे हा उद्देश असता कामा नये,'' असे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी व्यक्‍त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात शनिवारी (ता. पाच) ते बोलत होते. 14 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाचे उद्‌घाटन रझा मुराद यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धिविनायक काणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, अधिसभा सदस्य व आमदार अतुल सावे, महोत्सवाचे निरीक्षक डॉ. प्रमोद पाब्रेकर, डॉ. विवेक साठे, डॉ. निहाल शेख, ईश्वर मोहरले, विजय सिलहारे, बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, स्वागताध्यक्ष प्रा. गजानन सानप, डॉ. सुहास मोराळे उपस्थित होते.

श्री. मुराद यांनी आपल्या करारी आवाजात "प्यारे दोस्तों' असे म्हणताच, उपस्थितांनी टाळ्यातून दाद दिली. 'गालियां कानों पर नहीं पहुंचती थी, अब तालियॉं पहूंच रही है'' अशी मिश्‍किली करतानाच ते म्हणाले, की आपल्याच सादरीकरणात गुंगून न जाता दुसऱ्यांचे कार्यक्रमदेखील पाहावेत. सिनिअर्स काय करतात ते पाहावे, माणूस पाहूनच शिकतो. जगात भारतीय संस्कृतीसारखी श्रीमंती कुठेच नाही. तो ठेवा जपला पाहिजे, अशी कळकळीची विनंती त्यांनी भावी कलाकारांना केली.

मराठवाडा ही ज्ञानवंत, कलावंतांची भूमी असल्याचे डॉ. चोपडे म्हणाले. तर महोत्सवातून समतावादी विचारांचा कलावंत घडेल, अशी अपेक्षा प्रा. सानप यांनी व्यक्‍त केली. सूत्रसंचालन प्रा. महेश अचिंतलवार यांनी केले. डॉ. प्रदीप जब्दे यांनी आभार मानले.

कार्यशाळा घ्या, मी येतो...
देश आम्हाला काय देतो, यापेक्षा आपण देशाला काय देतो हे महत्त्वाचे आहे. हाच दृष्टिकोन प्रत्येकाचा असावा. समाजातून जे मिळाले आहे ते परत करायचे आहे. आवाजासाठी कोणी कार्यशाळा आयोजित करणार असाल, तर मला भेटू शकता. मी मार्गदर्शन, सहकार्य करीन, असे रझा मुराद यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

मेरा नंबर कब आएगा...
उद्‌घाटनाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू झाला. आधी कुलगुरूंचा अध्यक्षीय समारोप, नंतर विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संचालकांचे प्रस्ताविक. त्यात मान्यवरांची लांबलचक मनोगते. यामुळे रझा मुराद मोबाईलमध्ये रमले होते. एक वाजून 20 मिनिटांनी त्यांना मार्गदर्शनासाठी बोलाविण्यात आले. भाषणाला उभे राहताच, त्यांनी "मेरा नंबर कब आएगा असाच विचार करीत होतो. मात्र, साईबाबांच्या मार्गावर चालणारा मी असल्याने श्रद्धा, सबुरी ठेवली आणि तुमच्यासमोर उभा राहिलो,' असा टोला लगावताच आयोजक हिरमुसले, तर उपस्थितांत हशा पिकला.

कुजबूज इंद्रधनुष्य अन्‌ 56 दरवाजांची
स्वागताध्यक्षांच्या सनसनाटी वक्‍तृत्वाने सारेच भारावले होते; मात्र त्यांनी या ओघात 52 दरवाजे असलेल्या शहराची ओळख चक्‍क 56 दरवाजांचे शहर अशी करून दिली. यामुळे पाहुणे नाही, तर उपस्थितांमध्ये चांगलीच कुजबूज झाली. त्यानंतर आभारासाठी आलेल्या कुलसचिवांनीही इंद्रधनुष्यातून आता बाण सुटला आहे, असे म्हणताच चर्चेला पुन्हा ऊत आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com