अतिक्रमण हटले; पण संसार उघड्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

जालना - जुना जालन्यातील इंदिरानगर भागातील अतिक्रमणांवर नगरपालिकेने गुरुवारी (ता. 9) पुन्हा हातोडा मारला. पोलिस बंदोबस्तात सकाळीच सुरू झालेली मोहीम सायंकाळपर्यंत सुरूच होती. दिवसभरात तब्बल 43 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अनेकांनी उद्या काय या विवंचनेत रात्र जागून काढली.

जालना - जुना जालन्यातील इंदिरानगर भागातील अतिक्रमणांवर नगरपालिकेने गुरुवारी (ता. 9) पुन्हा हातोडा मारला. पोलिस बंदोबस्तात सकाळीच सुरू झालेली मोहीम सायंकाळपर्यंत सुरूच होती. दिवसभरात तब्बल 43 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अनेकांनी उद्या काय या विवंचनेत रात्र जागून काढली.

जुन्या जालन्यातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या भाग्यनगरमधून जाणाऱ्या डीपी रोडवर इंदिरानगर परिसरात दोन्ही बाजूंनी नागरिकांनी पत्र्याचे शेड, सिमेंट, विटा व मातीचे कच्चे, तर काहींनी चक्क आरसीसीचे पक्के बांधकाम केले आहे. याचा फायदा काही धनदांडग्यांनी आपल्या घरांच्या सुरक्षा भिंती वाढवून घेत अतिक्रमणे केली आहेत. वर्षभरापूर्वी या रस्त्यावरील काही अतिक्रमणे पालिकेने हटविली होती. गुरुवारी पुन्हा ही कारवाई करण्यात आली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, स्वच्छता विभागप्रमुख श्री. बिटले, पोलिस निरीक्षक बालासाहेब पवार आदी सकाळी नऊ वाजता मोठ्या फौजफाट्यासह इंदिरानगरात पोचले. सुरवातीला नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत तोंडी सूचना देण्यात आल्या. यास किरकोळ विरोधही झाला. मात्र, पोलिस बंदोबस्तासमोर अतिक्रमणधारकांनी नमते घेतले. मुक्तेश्‍वर तलावाच्या बाजूने अतिक्रमण हटावच्या कारवाईस सुरवात झाली. मुख्य रस्त्याच्या आत येणारे व पालिकेच्या नियोजित उद्यानाच्या जागेतील पत्र्याचे शेड, कच्चे व पक्के बांधकाम असलेली घरे, पक्‍क्‍या सुरक्षा भिंती जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आल्या. दिवसभरात तब्बल 43 अतिक्रमणे तोडण्यात आली. या कारवाईत दोन जेसीबी, 12 ट्रॅक्‍टर, 250 सफाई कामगार, शंभरहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने जेसीबीच्या मदतीने नाली करण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.

पप्पा, आपले घर कुठे गेले?
अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या अनेकांना गुरुवारी कामावर जाता आले नाही. आता घर तुटणारच हे लक्षात आल्यानंतर अनेकांनी हाती लागेल ते साहित्य वाचविण्यासाठी धावपळ सुरू केली. तर काहीजण डोळ्यांत अश्रू आणत आपल्या तुटणाऱ्या घराकडे पाहत राहिले. सकाळी शाळेत गेलेली मुले जेव्हा दुपारी परत आली, तेव्हा आईवडिलांना आपले घर कुठे गेले, असे विचारत तुटलेल्या घराकडे निरागस नजरेने पाहत राहिली.

पंचनामा नाही
अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यापूर्वी मुख्य रस्त्यात येणारी, रस्त्याच्या कडेला असणारी पक्की व कच्च्या बांधकामाची किती घरे तुटणार याचा पंचनामा संबंधित विभागाने करायला हवा होता. मात्र, कुठलाच पंचनामा करण्यात आला नाही, तसेच संबंधितांना नोटिसाही देण्यात आल्या नाहीत, अशी तक्रार काही स्थानिक नागरिकांनी केली. अतिक्रमण हटाव मोहीम म्हणजे धनदांडग्यांची घरे वाचविण्यासाठी गरिबांच्या घरावर बुलडोझर, असा प्रकार असल्याचे काहींनी सांगितले. दरम्यान, पालिकेची अतिक्रमण हटावची कारवाई नियमानुसारच झाली. कुठल्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही, असे मुख्याधिकारी श्री. खांडेकर यांनी स्पष्ट केले.