मृत्यूच्या सापळ्यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

औरंगाबाद - बीड बायपास रोडवरील अपघातांची मालिका रोखण्याच्या दृष्टीने सर्व्हिस रोडचा वापर वाढविण्याशिवाय सध्यातरी पर्याय दिसत नाही. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याने जिल्हा प्रशासनानेच आता यात पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व्हिस रोडचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी (ता.15) सकाळी दहा वाजता बैठक घेण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. बीड बायपास महामार्ग आता शहराचाच एक भाग झाल्याने मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. या महामार्गावर बाळापूर, गांधेली, देवळाई, सातारा ही शहरालगतची गावे जोडली गेली आहेत. शहराजवळचा परिसर असल्यामुळे मोठ्या संख्येने नागरी वसाहती झाल्या. भरधाव धावणाऱ्या जड वाहतुकीमुळे येथे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. बीड बायपास महामार्ग 60 मीटरचा मंजूर असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने 30 मीटरचा दुपदरी रस्ता तयार केला आहे. साठ मीटरच्या रस्त्यामध्ये सर्व्हिस रोडसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व्हिस रोड करण्याकडे आतापर्यंत दुर्लक्षच केले. गेल्या महिन्याभरात बीड बायपासवर विविध अपघातांत सहा जणांचे बळी गेले. 

जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी बीड बायपास रोडवर होणाऱ्या अपघाताबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, पोलिस, आरटीओ, राष्ट्रीय महामार्ग, रस्ते विकास महामंडळ विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी याच विषयावर बैठकही ठेवली आहे.