लाडक्‍या लेकींसाठी गुंतवणुकीचा पाऊस

लाडक्‍या लेकींसाठी गुंतवणुकीचा पाऊस

सुकन्या समृद्धीत औरंगाबाद, खानदेशात 135 कोटी जमा; मुलींच्या नावाने पावणेदोन लाख खाती
औरंगाबाद - सुकन्या समृद्धी योजनेला भारतीय टपाल खात्यात तुफान प्रतिसाद मिळाला असून जानेवारी 2015 ते ऑक्‍टोबर 2016 पर्यंत मराठवाडा आणि खानदेशातील 12 जिल्ह्यांत 135 कोटी 61 लाख 2 हजार 841 रुपयांची बंपर गुंतवणूक झाली. योजनेची सुरवात होताच अनेकांची पावले टपाल खात्याकडे वळली असून लाडक्‍या लेकीच्या भविष्यासाठी आतापर्यंत एक लाख 75 हजार 453 खाती उघडण्यात आली आहेत. सुकन्या समृद्धीत गुंतवणुकीसाठी टपाल विभागात पैशांचा पाऊस पडला आहे.

अशी आहे योजना
आकर्षक व्याजदर, कर सवलत असल्याने पालकांचा आपल्या लाडक्‍या लेकींच्या भविष्यासाठी खाती उघडण्याकडे वाढता कल आहे. सध्या टपालाच्या औरंगाबाद विभागात 14 मुख्य टपाल कार्यालय तर 478 उपटपाल कार्यालय आहेत. या योजनेत पालक कन्येच्या नावाने जवळच्या कोणत्याही टपाल कार्यालयात खाते उघडू शकतात. एक पालक जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाती उघडू शकतो. यासाठी कन्येचे वय 10 वर्षांच्या आत असणे आवश्‍यक आहे. मुलीचा जन्माचा दाखला व पालकाचे "केवायसी' कागदपत्र खाते उघडण्यासाठी आवश्‍यक आहेत; मात्र या खात्यामध्ये वारस नेमण्याची सुविधा नाही. एक हजार रुपये भरून खाते उघडता येते. त्यानंतर 100 च्या पटीत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. या खात्यात वर्षात कमीत कमी एक हजार रुपये भरणे आवश्‍यक आहे. न भरल्यास खाते खंडित होईल व पुनर्जीवित करण्यासाठी 50 रुपये दंड आकारण्यात येतो. साधारणपणे महिन्याला एक हजार रुपये जरी जमा केले, तर 21 वर्षांनंतर पालकांना 6 लाखांच्या पुढे रक्कम मिळेल.

मुदतपूर्व बंद शक्‍य
खातेधारक मुलगी देशात कुठेही गेली तरी, तिच्या नावावर असणारे खाते हस्तांतरित करता येऊ शकते. शहर असो, की ग्रामीण भाग कुठेही खाते हस्तांतर सहज शक्‍य आहे. मुलगी चौदा वर्षांची होईपर्यंत खात्यात रक्कम ठेवणे बंधनकारक आहे. मुलीचे 18 व्या वर्षी लग्न झाल्यास खाते मुदतपूर्व बंद करता येते. 21 वर्षांनंतर खाते परिपक्व झाल्यानंतर बंद करता येईल.

मराठवाडा, खानदेशात मोठी गुंतवणूक
भारतीय टपाल खात्यात सुकन्या समृद्धी योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. टपाल विभागात लोकांनी स्वतःहून येत लेकींच्या नावांनी खाती उखडली आहेत. टपालात औरंगाबाद विभागात खानदेशाचासुद्धा समावेश होतो. एकूण बारा जिल्ह्यांत कोट्यवधींची गुंतवणूक झालेली आहे. सर्वाधिक 44 कोटींची गुंतवणूक नाशिक मुख्य कार्यालय, नाशिक रस्ता कार्यालयात झाली आहे. भुसावळमध्ये 18 कोटी, औरंगाबादेत 14, लातूरमध्ये 12 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली. प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तरी तेथील रक्कम कोटींमध्येच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com