जागतिकीकरणामुळे शेती उद्‌ध्वस्त - डॉ. कोत्तापल्ले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

जालना - जागतिकीकरणामुळे उद्योगपतींची संपत्ती वाढली आणि देशातील सुजलाम्‌-सुफलाम्‌ शेती उद्‌ध्वस्त झाली. १९९३ नंतर देशातील तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. देशात एकीकडे काहींचे लाखोंचे उत्पन्न आहे, तर काही दिवसाला वीस रुपये कमवतात. देशातील वाढती विषमता स्मार्ट सिटी बनविणाऱ्यांच्या लक्षात येत नसल्याची खंत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.

जालना - जागतिकीकरणामुळे उद्योगपतींची संपत्ती वाढली आणि देशातील सुजलाम्‌-सुफलाम्‌ शेती उद्‌ध्वस्त झाली. १९९३ नंतर देशातील तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. देशात एकीकडे काहींचे लाखोंचे उत्पन्न आहे, तर काही दिवसाला वीस रुपये कमवतात. देशातील वाढती विषमता स्मार्ट सिटी बनविणाऱ्यांच्या लक्षात येत नसल्याची खंत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित दोनदिवसीय पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाप्रसंगी रविवारी (ता.१०) ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे होते. स्वागताध्यक्ष साईनाथ पवार, दीनानाथ मनोहर, महावीर जोंधळे, संयोजक अण्णा सावंत यांची या वेळी उपस्थिती होती. डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले.

पुढे बोलताना श्री. कोत्तापल्ले म्हणाले, की देशात स्वतंत्र विचार करणाऱ्यांची मुंडके मोडण्याची फार जुनी परंपरा आहे. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हितसंबंध टिकून राहावे म्हणून हे लोक असे करीत असतात. आपण आज जातीच्या आहारी एवढे गेलो आहोत की माणूसपण विसरून जात आहोत. जातीची भावना एवढी तीव्र का होत आहे, याचाही विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 

जागतिकीकरणामुळे शेती उजाड बनत आहे आणि आपलीच माणसे दुसऱ्यांचा खिसा भरत आहेत. जातीतच सुरक्षितता शोधणाऱ्यांना हेरून राजकारणी फायदा करून घेत आहेत; पण हे आपण दिसूनही निमूटपणे पाहत राहतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अण्णा सावंत यांनी प्रास्ताविकात भूमिका मांडली. तर स्वागताध्यक्ष साईनाथ पवारांनी ‘सीटू’च्या माध्यमातून घेत असलेल्या या  संमेलनाच्या माध्यमातून श्रमिकांचे प्रश्‍न पुढे आले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. 

श्रमाच्या विभागणीमुळेच भेदभाव - डॉ. साळुंखे 
बौद्धिक आणि शारीरिक श्रमाची विभागणी करण्यात आल्यामुळेच भेदभाव निर्माण झाला आहे. मानवी शरीराची रचना मेंदू, वाणी आणि हाताने परिपूर्ण होत असते. यांच्या एकत्रिकरणातूनच नवनिर्मिती होत असते; परंतु आज तसे होत नसल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केली. मेंदू, वाणी, हाताची विभागणी करण्यात आल्याने विकास रखडला. विकास करायचा असेल तर यांची सांगड घालणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. सोबतच शुद्धतेचा आव आणणाऱ्यांनी सफाई कामगारांना हीनतेची वागणूक द्यायला नको. कारण ते आपल्याला स्वच्छतेचा संदेश देत असतात. या देशाला अहिंसेची देणगी मिळाली आहे. ती जपली पाहिजे, फुलविली पाहिजे, असेही ते म्हणाले.