बियाणे उद्योगाचा जनक हरपला

बियाणे उद्योगाचा जनक हरपला

बद्रीनारायण बारवाले यांचे निधन, मुंबईत अंत्यसंस्कार

जालना - 'महिको’च्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत एकहाती क्रांती घडवून आणणारे उद्योजक आणि स्वातंत्र्यसैनिक बद्रीनारायण बारवाले (वय ८७) यांचे सोमवारी (ता. २४) मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मंत्री अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर उपस्‍थित होते.

जालना येथील महाराष्ट्र हायब्रीड सीड्‌स कंपनीचे (महिको) चेअरमन, संस्थापक असलेल्या बद्रीनारायण बारवाले यांनी आपल्या कर्तृत्वातून जालना जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. बियाणे निर्मितीत त्यांनी घडवलेल्या क्रांतीमुळे बियाणे उद्योग हे एक स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. भरपूर उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा शोध लावल्यानंतर त्याच्या देशभर वितरणाच्या, साठवणुकीच्या सुविधांचा आणि त्यासंबंधी इतर अनेक पूरक व्यवसायांचाही विस्तार देशात झाला. यातून मोठीच रोजगारनिर्मितीही झाली. 

बद्रिनारायण बारवाले यांच्या मागे पत्नी गोमंती बद्रीनारायण बारवाले, एक मुलगा व पाच मुली आहेत. मुलगा राजेंद्र बद्रीनारायण बारवाले हे महिको सीड्‌समध्ये संचालक म्हणून काम पाहतात; तसेच उषा झेर, सविता, आशा, प्रेमा, शोभा अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत. मूळचे हिंगोली येथील बद्रीनारायण बारवाले हे जयकिशन कागलीवाल यांचे पुत्र असून त्यांना रामुलाल बारवाले यांनी दत्तक घेतले होते.

अल्प परिचय
बद्रीनारायण रामूलाल बारवाले यांचा जन्म हिंगोली येथे २७ ऑगस्ट १९३० रोजी झाला. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग घेतला. स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ आणि बापूसाहेब काळदाते यांच्यासोबत त्यांनी काम केले. १९६४ मध्ये ‘महिको’ची स्थापना करून बियाणे आणि अन्नधान्य निर्मितीमध्ये क्रांती घडवली. सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेचे ते काही काळ सदस्य व नंतर उपाध्यक्ष राहिले. जून १९९३ मध्ये जालना येथे बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच १९९८ मध्ये गणपती नेत्रालय स्थापन करून दीनदुबळ्या, गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. अन्नसुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना जागतिक पातळीवरील कृषी क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा जागतिक अन्न पुरस्कार (वर्ल्ड फूड प्राईज) देऊन सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने २००१ मध्ये त्यांचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला.

अनेक पुरस्कारांचे मानकरी
त्यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल १९८९ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा राष्ट्रीय संशोधन आणि विकास पुरस्कार, १९९० मध्ये इंटरनॅशनल सीड्‌स ॲण्ड सायन्स टेक्‍नॉलॉजीचा पुरस्कार, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचा पुरस्कार, १९९६ मध्ये फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल सीड्‌स मॅनचे मानद सदस्यत्वही देण्यात आले.

बद्रीनारायण बारवाले हे खऱ्या अर्थाने सीड उद्योगाचे जनक होते. हायब्रीड नवीन असताना त्या काळात ते लोकांच्या मनात रुजविण्याचे काम त्यांनी केले. या उपक्रमास बॅरिस्टर जवाहर गांधी, दादासाहेब अन्वीकर, निवृत्ती पाटील साळंुके गोलटगावकर, पद्मश्री सखारामपंत पाटील, तसेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी प्रोत्साहन दिले. या क्षेत्रातील कुठलीही पदवी नसताना त्‍यांनी देदीप्यमान यश मिळविले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- विजयअण्णा बोराडे, कृषिभूषण, औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com