बदनामीसाठी तूर विक्रीचे राजकारण - अर्जुन खोतकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

जालना - "मी शेतकरी असून, तूर उत्पादन करून ती नाफेडला विकली तर गुन्हा आहे का? मी व माझ्या परिवाराने नियमानुसार 274 क्विंटल तूर नाफेडला विकली. तरीही बदनामी करण्यासाठी या विषयावरून राजकारण केले जात असल्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी येथे स्पष्ट केले.

जालना - "मी शेतकरी असून, तूर उत्पादन करून ती नाफेडला विकली तर गुन्हा आहे का? मी व माझ्या परिवाराने नियमानुसार 274 क्विंटल तूर नाफेडला विकली. तरीही बदनामी करण्यासाठी या विषयावरून राजकारण केले जात असल्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी येथे स्पष्ट केले.

खोतकर यांनी विकलेल्या तुरीवरून गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यावर त्यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ते म्हणाले, 'मी व माझ्या परिवारातील सदस्यांच्या नावावर 377 क्विंटल तूर खरेदी केल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. आम्ही विकलेल्या तुरीसंदर्भात "नाफेड'कडूनच रीतसर माहिती घेतली. "नाफेड'ला आम्ही 377 क्विंटल तूर विकल्याची नोंद नाही. आम्ही 274 क्विंटल तूर विकली असून, त्याचा पीकपेरा "नाफेड'ला दिला आहे. माझ्या नावावर 13 फेब्रुवारीला 29 क्विंटल, 14 फेब्रुवारीला 93.50, संजय खोतकर यांच्या नावावर आठ फेब्रुवारीला 6.50, 18 फेब्रुवारीला 45, योगिता संजय खोतकर यांच्या नावावर 18 फेब्रुवारीला 50, तर दोन मार्चला सीमा अर्जुन खोतकर यांच्या नावावर 50 क्विंटल तूर विकली आहे.

नाफेडला तूर विकलेल्या आठ हजार चारशे शेतकऱ्यांची मूळ यादी इंग्रजीत आहे. प्रसार केलेली खोटी यादी मराठीत आहे. ती एका राजकीय नेत्याच्या घरात बसून तयार करण्यात आली आहे. या यादीत 60 ते 70 लोकांची नावे दोन वेळा आली आहेत. त्यामुळे केवळ बदनामी करण्यासाठी या विषयावरून राजकारण केले जात आहे. खोटी यादी तयार करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.''

शेतकऱ्यांसाठी लढलो म्हणून...
मी व्यापारी किंवा तूर खरेदीदार नाही. मी शेतकरी आहे. बाजार भावाने तूर खरेदी करून नाफेडला विकली, तर त्यात केवळ 85 हजार रुपयांची तफावत येते. मी 85 हजार रुपयांसाठी हे केले का? शिवसेना व मी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सुमारे एक कोटीची मदत केली. सभागृहामध्ये तूर खरेदीसंदर्भात लढा दिला. त्यामुळे केवळ माझी, माझ्या पक्षाची बदनामी करण्याच्या हेतूने हा प्रकार घडवून आणल्याचे खोतकर म्हणाले.