वखारचे गोदाम तुरीने भरगच्च

वखारचे गोदाम तुरीने भरगच्च

जालना - गतवर्षी जिल्ह्यामध्ये तुरीचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे ‘नाफेड’मार्फतही तुरीची मोठी खरेदी करण्यात आली. ही खरेदी केलेली तूर वखर महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व गोडाऊन धान्याने भरलेले आहेत. परिणामी पुढील वर्षी धान्य ठेवण्याची अडचण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

जालना जिल्ह्यामध्ये वखर महामंडळाचे सात गोडाऊन आहेत. यामध्ये जालना येथे जालना भोकरदन रोडवर, जालन्यातील जुना मोंढा; तसेच बोरखेडी, परतूर, तीर्थपुरी, वडीगोद्री, आष्टी या ठिकाणी गोडाऊन आहेत. जिल्ह्यातील या सातही गोडाऊनमध्ये ९० हजार ९७० टन धान्य साठा होऊ शकतो. यामध्ये ६८ हजार ५२ टन साठा सध्या आहेत. त्यामुळे जवळपास ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक धान्याचा साठा या गोडाऊनमध्ये सद्यःस्थितीमध्ये आहे. 

विशेष म्हणजे यामध्ये १४ हजार ६६४ टन तूर आहे. या गोडाऊनमधील धान्य हे ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये शासनाच्या आदेशाप्रमाणे गोडाऊनमधून बाजारात आणले जाते; मात्र गतवर्षी झालेल्या विक्रमी उत्पादनामुळे यंदा धान्याच्या साठा बाजारामध्ये आणण्याचे प्रमाण अल्प असण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुढील वर्षी खरेदी केलेला माल ठेवणार कुठे, असा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

जालन्याचे धान्य औरंगाबादला
गतवर्षी तुरीचे भरमसाट उत्पादन झाले. त्यामुळे ‘नाफेड’ने खरेदी केलेल्या तुरीने जिल्ह्यातील सर्व गोडाऊन भरली आहेत. परिणामी शेवटच्या टप्प्यात ‘नाफेड’ने खरेदी केलेली जालना जिल्ह्यातील तूर ही औरंगाबाद येथील वखर महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली आहे. 

सध्याच्या स्थितीला जालना जिल्ह्यातील वखर महामंडळाचे सर्व गोडाऊन हे धान्याने भरलेले आहेत. ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे हे धान्य वितरित केले जाते. त्यानंतरच नवीन धान्य येथे ठेवता येईल. 
- पी. बी. देवकाते, विभागीय व्यवस्थापक, वखर महामंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com