सुशोभीकरणाअभावी काळा दरवाजा काळोखात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - किल-ए-अर्कच्या अगदी समोर असलेला काळा दरवाजा सुदैवाने सुस्थितीत आहे; मात्र सफाईअभावी दरवाजाची दुरवस्था झाली असून, साफसफाई व परिसराचे सुशोभीकरण झाल्यास पर्यटकांना काळा दरवाजाच्या सौंदर्याचा एक चांगला नमुना पाहायला मिळेल. 

औरंगाबाद - किल-ए-अर्कच्या अगदी समोर असलेला काळा दरवाजा सुदैवाने सुस्थितीत आहे; मात्र सफाईअभावी दरवाजाची दुरवस्था झाली असून, साफसफाई व परिसराचे सुशोभीकरण झाल्यास पर्यटकांना काळा दरवाजाच्या सौंदर्याचा एक चांगला नमुना पाहायला मिळेल. 

शहरात किल-ए-अर्क नावाचा एक चखोट तटबंदी असलेला महाल आहे, याची नव्या पिढीतील अनेकांना माहिती नाही. शहराच्या मध्यभागी असलेल्या या राजमहालासमोर आहे तो काळा दरवाजा. अन्य दरवाजांपेक्षा चखोट आणि वेगळी बांधणी असलेल्या काळा दरवाजाची डागडुजी झाल्यामुळे त्याचे संवर्धन झाले आहे. या दरवाजाला अवजड वाहतुकीचे हादरेही तुलनेने कमी बसतात. त्यामुळेच काळा दरवाजा उत्तम स्थितीत आहे. शाही परिवारातील सदस्यांचे लष्कर या दरवाजात तैनात असायचे, असे इतिहासकार रफत कुरैशी सांगतात. त्यामुळे या दरवाजाचे वेगळे महत्त्व आहे. या दरवाजाचा अन्य दरवाजांप्रमाणे स्वच्छतागृह म्हणून वापर होत नसला तरी सफाईची मात्र गरज आहे. 

तटबंदीची पुनर्बांधणी व्हावी 
शहरातील इतर दरवाजांदरम्यान असलेल्या तटबंदीची पडझड झालेली आहे; मात्र काळा दरवाजा आणि नौबत दरवाजादरम्यान असलेल्या तटबंदीला भगदाड गेलेले नाहीत. त्यामुळे या दोन दरवाजांमध्ये असलेल्या तटबंदीचे जतन व्हावे. तसे झाले तर किल-ए-अर्कची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी जिवंत होईल आणि त्याचा फायदा पर्यटनवृद्धीसाठी केला जाऊ शकतो. 

झुडपे, भंगार गाड्यांनी झाकला दरवाजा 
व्हीआयपी रोडवरून जाताना काळा दरवाजा सहज दृष्टीस पडत नाही. झाडे, गवत आणि भंगार गाड्यांचा या दरवाजाला गराडा पडला आहे. भंगार हटवून या दरवाजाभोवती हिरवळ तयार केली गेली तर पर्यटकांच्या गाडीचे ब्रेक येथे आपोआप लागतील. 

Web Title: kala darwaja in aurangabad