कामगार मंत्र्यांच्या गावात कामगार संमेलन,‘मसाप’चा पुढाकार

कामगार मंत्र्यांच्या गावात कामगार संमेलन,‘मसाप’चा पुढाकार

लातूर : ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे... रोजी रोटीचा सवाल, रोजचाच आहे’ अशा वेगवेगळ्या काव्यातून कामगारांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. अशाच आजच्या साहित्यिकांच्या भावना व्यापक पातळीवर व्यक्त व्हाव्यात यासाठी लातूर जिल्ह्यातील निलंग्यात प्रथमच राज्यव्यापी कामगार साहित्य संमेलन घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कामगार मंत्र्यांच्या गावातच अशा प्रकारचे संमेलन होणार आहे. त्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे.

कामगारांच्या व्यथा-वेदना, त्यांचे जगणे कथा-कादंबऱ्यातून शब्दबद्ध होत आहे. यासाठी झटणाऱ्या लेखक-कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी कामगार साहित्य संमेलन घेण्याचा विचार ‘मसाप’च्या रविवारी (ता. १५) झालेल्या बैठकीत पुढे आला आहे. या विषयावर लातूरचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची एकत्रित बैठक सोमवारी (ता. २३) लातूरात होणार आहे. या बैठकीत कामगार साहित्य संमेलनावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कामगार साहित्य संमेलनावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर या संमेलनाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. संमेलन किती दिवसांचे असेल, संमेलनाध्यक्षाची निवड कशी करायची हेही बैठकीनंतरच ठरवले जाणार आहे. साहित्य महामंडळ आणि महामंडळाच्या संलग्न संस्थांकडून अद्याप अशा प्रकारचे संमेलन घेण्यात आले नव्हते. पण मराठवाडा साहित्य परिषदेने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे असे संमेलन प्रथमच होत आहे. या संमेलनाशिवाय मराठवाडा साहित्य परिषदेचे आगामी मराठवाडा साहित्य संमेलन उदगीरमध्ये घेण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. उदगीर शाखेचे अध्यक्ष रामचंद्र तिरूके यांनी या संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. त्यामुळे या वर्षाअखेरीस दोन संमेलनाची पर्वणी लातूरकरांना मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com