महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे सोयगावातून अपहरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

चौघांविरुद्ध गुन्हा - कारण अस्पष्ट; माळेगाव येथील युवक
जरंडी - सोयगाव शहरातील संत ज्ञानेश्‍वर महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे चौघा अज्ञातांनी मंगळवारी (ता. १२) अपहरण केल्याची घटना  घडली. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात बुधवारी (ता १३) चार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. महाविद्यालयीन तरुणाच्या अपहरणाचे अद्याप कारण स्पष्ट झाले नाही.

चौघांविरुद्ध गुन्हा - कारण अस्पष्ट; माळेगाव येथील युवक
जरंडी - सोयगाव शहरातील संत ज्ञानेश्‍वर महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे चौघा अज्ञातांनी मंगळवारी (ता. १२) अपहरण केल्याची घटना  घडली. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात बुधवारी (ता १३) चार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. महाविद्यालयीन तरुणाच्या अपहरणाचे अद्याप कारण स्पष्ट झाले नाही.

हा युवक माळेगाव (पिंपरी) येथील असून अजय रमेश पाटील (वय १८) असे त्याचे नाव आहे. अजय पाटील याने सोयगावच्या महाविद्यालयात १२ वी वर्गात व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी अजय पाटील हा जरंडी येथून बसने सोयगावच्या महाविद्यालयात बारावीच्या गुणवत्ता याद्या पाहण्यासाठी मंगळवारी गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा रात्रभर शोध घेतला. अखेर त्याचे वडील रमेश त्र्यंबक पाटील यांनी बुधवारी (ता. १३) सोयगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाच्या ग्रंथालयाजवळून त्याचे अपहरण झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

नामांकित असलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाविद्यालयात अपहरण झाल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली. घटनेमुळे महाविद्यालय परिसर व बसस्थानक आदी भागात बुधवारी (ता. १३) पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोयगाव पोलिसांनी महाविद्यालयात जाऊन घटनेची चौकशी केली.

शोधपथक रवाना
अजयच्या शोधासाठी सोयगाव पोलिस ठाण्याची दोन पथके नाशिक, औरंगाबादकडे रवाना झाली आहेत. सोयगाव पोलिसांनी अजयचा मोबाईल लोकेशन घेतले असता फर्दापूर (ता. सोयगाव) च्या दिशेने अज्ञात वाहनात तो असल्याचे समोर आले. विविध ठाण्यांना याबाबत माहिती दिल्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाने यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संजय सहाने, उपनिरीक्षक गणेश जागडे, जमादार भागीनाथ वाघ, दिलीप पवार, दिलीप तडवी, कपिल बनकर, सुभाष पवार आदी तपास करीत आहेत.

पालकांचा रोष                                       
दरम्यान, संत ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांचे महाविद्यालयावरील नियंत्रण सुटले असल्याचा आरोप पालक रमेश पाटील यांनी केला. प्राचार्य अग्निहोत्री हे वारंवार बैठकांचे कारण पुढे करीत महाविद्यालयात गैरहजर राहत असतात.

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातून अपहरण झालेला मुलगा मंगळवारी (ता. १२) महाविद्यालयात आला होता का नाही, याबाबत साशंकता आहे. माहिती घेण्याचे काम सुरू आहे. महाविद्यालयात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.
- डॉ. गणेश अग्निहोत्री, प्राचार्य, संत ज्ञानेश्‍वर महाविद्यालय

या प्रकरणी दोन पथके औरंगाबादकडे रवाना झाली आहेत. त्याचे लोकेशन फर्दापूरच्या दिशेने आढळते. त्या विद्यार्थ्याचा मोबाईल टॅपिंगवर असला तरी तो बंद असल्याने तपासात अडचणी येत आहेत.
- गणेश जागडे, उपनिरीक्षक, सोयगाव ठाणे

महाविद्यालयात तातडीची बैठक                   
शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची घटना घडल्यानंतर महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी तातडीची बैठक घेतली. यावर उपाययोजनेची चर्चा केली. अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची माहिती महाविद्यालयातून गोळा केली.